ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी महापालिका पथकांमध्ये वाढ
महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या उच्चतम थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा
पनवेल : पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी महापालिकेने पथकामध्ये वाढ केली आली आहे. त्यानुसार आता एकूण १० पथकांच्या माध्यमातून जप्तीपूर्ण नोटीसा देण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनुसार १ नोव्हेंबर पासून महापालिका कार्यक्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना महापालिकेच्या वतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी वाढीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत औद्योगिक १०० मालमत्तांना, निवासी ३०१ मालमत्तांना, वाणिज्य (कमर्शिअल) क्षेत्रातील ३४९ मालमत्ता अशा एकूण ७५० थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या कामासाठी खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल अशा चारही नोडमध्ये दहा टीम करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. तसेच न्यायालयानेही मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीवर भर देत आहे. यासाठी महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या औद्योगिक, निवासी, वाणिज्य (कमर्शिअल) क्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता अटकावणी संबंधीच्या तसेच जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात जप्तीपूर्व नोटीसा दिलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी महापालिका तर्फे चार प्रभागातील जप्ती नोटिसा देण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत. तसेच मालमत्ताधारकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत.
या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांकडून उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून ते १ नोंव्हेंबर पर्यंत २१० कोटी रुपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये सात महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रक्कमेची करवसुली होण्याची सदर पहिलीच वेळ आहे. गेल्या चार वर्षांपासून ते आजपर्यंत ४८५ कोटींची वसुली करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने दिवसेंदिवस मालमत्ता कर भरण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरल्यास शासकीय कर वगळता मालमत्ताधारकांना दोन टक्के सूट मिळत आहे.
मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात रिक्षातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरल्यास मालमत्तांधारकांना दोन टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.
मालमत्ताधारकांना मालमत्तेचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी १८००५३२०३४० या टोल फ्री नंबरवर तसेच ८६६९९४१४८८ या व्हॉटस्ॲप नंबरवर आपले आधारकार्ड, सूची क्रमांक २ पाठवल्यास मोबाईल नंबर अपडेट केले जात आहेत. अनेकवेळेला एका मोबाईल नंबरवर विविध मालमत्ता दिसून येत असतात. अशावेळेला मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता क्रमांक तपासूनच मालमत्ता कर भरणा ऑनलाईन भरावा. तसेच मालमत्ताधारकाच्या मोबाईल नंबरवर स्वतःच्या मालमत्तेसोबत अधिकच्या मालमत्ता दिसत असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून किंवा व्हॉटस्ॲप क्रमांकावर आपल्या मालमत्तेची माहिती दिल्यास भरणा करतेवेळी येणाऱ्या समस्येचे निवारण महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. - गणेश शेटे, उपायुक्त-पनवेल महापालिका.