अस्वच्छ पनवेल!

अनेक ठिकाणी कचरा साचला, कचऱ्याला सुटली दुर्गंधी

नवीन पनवेल : पनवेल शहरात आणि इतर ठिकाणी कचऱ्याचे ढीग पहावयास मिळत आहेत. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

पनवेल महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचलेले आहेत. स्वच्छतेच्या कितीही बढाया महापालिका मारत असली तरीदेखील कचऱ्याची समस्या आजही कायम आहे. उरण नाक्याकडे जाणारा रस्ता, तक्का गावाजवळ, भाजी मार्केट जवळ कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. या कचऱ्याला दुर्गंधी सुटली आहे . त्यामुळे याठिकाणाहुन येणाऱ्या-जाणाऱ्या रहिवाशांना नाकावर हात किंवा रुमाल ठेवूनच पुढे जावे लागते. कचरा समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी महापालिकेवर संताप व्यक्त केला आहे.

शहरात ठिकठिकाणी भिंती तसेच पुलाखाली रंगरंगोटी करुन महापालिकेने स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. मात्र, पनवेल मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचू लागल्याने लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था महापालिकेची झाली आहे. पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखाली देखील ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील काही ठिकाणचा कचरा गेले कित्येक दिवसांपासून उचलला गेला नाही. तर कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जप्तीपूर्व नोटीसा देण्यासाठी महापालिका पथकांमध्ये वाढ