‘मेट्रो' लवकर सुरु करा अन्यथा सिडको भवन समोर उपोषण

‘राष्ट्रवादी'चे फारुक पटेल, ‘काँग्रेस'चे सुदाम पाटील यांचा इशारा

खारघर : ‘नवी मुंबई मेट्रो'ची सर्व कामे पूर्ण होवून जवळपास आठ महिने झाले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मिळत नसल्यामुळे ‘मेट्रो'चे उद्‌घाटन लांबणीवर पडत चालले आहे. त्यामुळे ‘सिडको'ने लवकरात लवकर मेट्रो सुरु करावी अन्यथा ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष'च्या वतीने सिडको मुख्यालयासमोर आंदोलन अथवा साखळी उपोषण केला जाईल, असा इशारा ‘राष्ट्रवादी'चे (शरद पवार) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फारुक पटेल यांनी सिडको प्रशासनाला दिला आहे.

‘सिडको'ने बारा वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या बेलापूर ते पेंधर मार्गावरील ‘नवी मुंबई मेट्रो'चे काम आठ महिन्यापूर्वी झाले आहे. गेल्या वर्षभरापासून ‘नवी मुंबई मेट्रो' सुरु होणार असल्याच्या चर्चेमुळे गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांनी लाखो रुपये कर्ज घेवून तळोजा वसाहतीत सिडको आणि खाजगी विकसकांकडून घरे खरेदी करुन वास्तव्यास आले आहेत. मात्र, मेट्रो काही  रुळावर आली नाही. ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन होणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. एवढेच नव्हेतर ‘सिडको'ने ‘महामेट्रो'ला पत्र देवून उद्‌घाटन होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना वेळ मिळत नसल्यामुळे ‘नवी मुंबई मेट्रो'चे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.

नवी मुंबई मेट्रो सुरु होणार असल्यामुळे तळोजा आणि खारघर मधील वाहतूक समस्या दूर होईल, असे येथील रहिवाशांना वाटत होते. मात्र, सिडको आणि लोकप्रतिनिधी यांना जनतेचे काही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. एकंदरीतच ‘सिडको'ने  लवकरात लवकर मेट्रो सुरु करावी अन्यथा ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'तर्फे आंदोलन अथवा साखळी उपोषण केला जाईल, असे ‘राष्ट्रवादी'चे प्रदेश सरचिटणीस फारुक पटेल यांनी सिडको प्रशासन आणि ‘राष्ट्रवादी'चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना  पत्राद्वारे सूचित केले आहे.

‘नवी मुंबई मेट्रो'चे काम ४ महिन्यापूर्वी पूर्ण झाले असून उद्‌घाटनाविना मेट्रो रखडली आहे. लवकरात लवकर ‘मेट्रो'चे लोकार्पण करुन मेट्रो सेवा प्रवाशांसाठी खुली करावी, अशी नागरिकांची मागणी असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यात निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे ‘नवी मुंबई मेट्रो'च्या लोकार्पणासाठी ‘तारीख पे तारीख' अशी रखडपट्टी चालू आहे. ‘नवी मुंबई मेट्रो'ची मुहूर्तमेढ काँग्रेस आघाडी सरकारने रोवली. आता ‘महायुती सरकार'च्या काळात जरी ‘मेट्रो'चे काम पूर्ण झाले असले तरीही गेले ४ महिने लोकार्पणाविना तेथील सगळ्या कामगारांना बसून पगार दिला जातोय. ४ महिन्यांपासून ‘नवी मुंबई मेट्रो' उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. तसेच नवी मुंबईकर नागरिक देखील ‘मेट्रो'च्या उद्‌घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे ‘नवी मुंबई मेट्रो'चे ‘महायुती सरकार'ने किंवा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन करावे अन्यथा काँग्रेस ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन करेल, असा इशारा ‘काँग्रेस'चे पनवेल शहराध्यक्ष सुदाम पाटील यांनी दिला आहे.

‘नवी मुंबई मेट्रो'चे काम बघणारे ‘सिडको'चे अधीक्षक अभियंता संतोष ओंबासे यांची भेट घेवून ‘मेट्रो'च्या उद्‌घाटनाविषयी विचारणा केली असता त्यांनी शासनाकडून उशिरा होत असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींशिवाय ‘नवी मुंबई मेट्रो' सुरु होण्याची शक्यता कमी आहे. ‘सिडको'ने लवकरच मेट्रो सुरु न केल्यास दिवाळी नंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या वतीने सिडको भवन समोर आंदोलन अथवा उपोषण करण्यात येणार आहे. -फारुक पटेल, सरचिटणीस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र (शरद पवार गट). 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चिर्ले गावातील अंडर पास बनला धोकादायक!