नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ​​​​​​​

तात्पुरत्या स्वरुपातील कर्मचाऱ्यांना २४ हजार, आशा वर्करना १४ हजार रुपये सानुग्रह

नवी मुंबई : येत्या १० नोव्हेंबर पासून दिवाळी सण सुरु होत असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महापालिका अधिकारी-कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी यादृष्टीने सन २०२२-२३ या वर्षाकरिता  महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी यांना ३० हजार रुपये तसेच करार, तात्पुरत्या स्वरुपातील कर्मचारी यांना २४ हजार रुपये आणि आशा वर्कर यांना १४ हजार रुपये रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे.

यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी, प्राथमिक-माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने अथवा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी-कर्मचारी यांना ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे ठोक मानधनावर, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक आणि मदतनीस यांना २४ हजार रुपये इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.
याशिवाय सर्व शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले तसेच शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पध्दतीवरील कर्मचाऱ्यांंप्रमाणे २४ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

अशाप्रकारे नवी मुंबई महापालिका मधील एकूण ४५५९ अधिकारी-कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वीच सानुग्रह अनुदानाची रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

दरम्यान, दिवाळी सणाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षीपेक्षा वाढीव सानुग्रह अनुदान वितरण करण्याच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतलेल्या कर्मचारीहिताय निर्णयाचे महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून स्वागत करण्यात आले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘मेट्रो' लवकर सुरु करा अन्यथा सिडको भवन समोर उपोषण