रेल्वे स्थानके की निवारा स्थानके?

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर बेघरांचे बस्तान

वाशी : नवी मुंबई शहरामध्ये ‘सिडको'च्या माध्यमातून उभारलेल्या रेल्वे स्थानकांची देशातील आधुनिक स्थानकांमध्ये गणना केली जात आहे. मात्र, याच रेल्वे स्थानकांची ‘सिडको'च्या माध्यमातून योग्य देखभाल राखली जात नसल्याने रेल्वे स्थानकांचा ताबा आता बेघरांनी घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना विशेषतः महिला वर्गाला या रेल्वे स्थानकांतून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहराला स्वच्छतेत अग्रेसर ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिका दरवर्षी कंबर कसत असते. दुसरीकडे नवी मुंबई शहरात महापालिका सोबतच सिडको, एमआयडीसी, बाजार समिती, रेल्वे आदि प्राधिकरणे  देखील असून त्यांच्या मालमत्ता आहेत. मात्र, या प्राधिकरणांनी विशेषतः ‘सिडको'ने स्वच्छतेकडे पाठ फिरवली असल्याने रेल्वे स्थानकांचा ताबा बेघरांनी घेतला आहे.

नवी मुंबई शहरात हार्बर आणि ट्रान्स-हार्बर या दोन मार्गावर रेल्वे धावतात. या मार्गांवर ‘सिडको'ने अत्याधुनिक अशी रेल्वे स्थानके उभारली आहेत. यातील नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, जुईनगर, सानपाडा, ऐरोली आदि रेल्वे स्थानकांवर सध्या बेघरांचा  रहिवास दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने या स्थांनकांना बकालपणा आले आहे. या ठिकाणी बेघरांचे बस्तान रेल्वे स्थानकालगत असलेल्या जागेवर वसले आहे. फुटपाथवर राहणारे बेघर नागरिक त्याच ठिकाणी आपला संसार थाटून बसलेले आहेत. या बेघरांकडून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरविण्यात येत आहे. परिणामी, रेल्वे स्थानक परिसराला बकालपणा आला आहे.

सदर रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी प्रवाशांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेवरच बेघरांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास तर सहन करावा लागतच आहे; शिवाय सदर बेघर त्याच ठिकाणी संसार थाटून बसल्याने तेथेच आंघोळ, कपडे, भांडी धुणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये रेल्वे स्थानक परिसर आहे की झोपडपट्टी? अशी स्थिती निर्माण झाली आहे. यावर सिडको तसेच महापालिकेने कारवाईची तत्परता दाखविली नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांचा परिसर कधी स्वच्छ होणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ​​​​​​​