ठाणे शहरात वाहतूक बदलाची एैसी तैसी

ठाणे शहरातील कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून केलेल्या बदलांचा उलटाच परिणाम ?

ठाणे : ठाणे शहरात गेले अनेक दिवस मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने केलेल्या बदलाने गेल्या काही महिन्यांत शहरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांसह घोडबंदर रोड येथेही अनेक वळण रस्ते बंद केले आहेत. या रस्त्यांमधील काही वळण रस्ते रातोरात तर, काही ठिकाणी तात्पुरते दुभाजक लावून तात्काळ बंद करून ही वाहतूक पर्यायीमार्गे वळवली आहे.

ठाणे शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवरील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या वाहतूक बदलानंतर अनेक ठिकाणी कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने हे बदल बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ पालिका व वाहतूक पोलिस प्रशासनावर आली आहे. यात माजिवडा आणि कापूरबावडी चौकांतील दुभाजक हटवून मुंबई-नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडील वळण खुले करून देण्यात आले आहे. तर, आराधना टॉकीज वळण रस्त्यावर ‘हाइट बॅरिअर' बसवण्यात आले. त्यामुळे या चौकात होणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. वाहतूक बदलांचा हा बदल स्वागतार्ह असला तरी गोखले रोड व सर्व्हिस रोडवरील दुभाजकांमुळे होणारे अपघात आणि कोंडीही कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अशाच पद्धतीने ठाण्यातील अत्यंत रहदारीयुवत जंक्शन अशी ओळख असलेल्या कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने ठाण्याहून येणाऱ्या वाहनांना मुंबई-नाशिक महामार्गाकडे जाण्याचा मार्ग दुभाजक बसवून बंद करण्यात आला होता. त्यामुळे माजिवडा गाव, लोढा गृहसंकुलाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना फटका बसत होता. ही वाहने वळण घेण्यासाठी कापूरबावडी चौकात जात होती. मात्र, याठिकाणी आधीच कशेळी, काल्हेर, बाळकूम, कोलशेत या भागात जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत असल्याने अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरासाठी स्थानिकांवर ३० ते ४० मिनिटे कोंडीत अडकून पडण्याची वेळ वाहन चालकांवर येत होती. अखेर स्थानिकांनी याप्रश्नी वाहतूक शाखेसह पालिका प्रशासनासमोर समस्या मांडली. अखेर या भागातील दुभाजक हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

तसेच, आराधना टॉकीज वळण रस्त्यावर दुभाजक हटवून केवळ हलक्या वाहनांसाठी मार्ग खुला करण्यात आला होता. मात्र येथून बस, टेम्पो, ट्रक वाहतूक करत असल्याने कोंडीची समस्या कायम होती. अखेर याठिकाणी ‘हाइट बॅरिअर' बसवून मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे हलक्या वाहनांचा मार्ग सुकर झाला आहे. 

सर्व्हिस रोड पार्किंगमध्ये अडकले
विवियाना मॉल, ज्युपिटर रुग्णालयाबाहेरील सर्व्हिस रोडवर दुतर्फा पार्किंग होत नसल्याने येथील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत राहते. मात्र, घोडबंदर रोड येथे मेट्रोचे काम सुरू असल्याने सकाळ-संध्याकाळ कोंडीच्या वेळी हलक्या वाहनांना सर्व्हिस रोडचा वापर करताना दुतर्फा असलेल्या पार्किंगमुळे कोंडीत अडकावे लागते. याठिकाणी वाहतूक शाखेने कार शोरूम, इलेवट्रॉनिक शोरूम्स, हॉटेल्स, दुकानांबाहेरील उभ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखेर वाशी रुग्णालयाला मिळाले वैद्यकीय अधीक्षक