अखेर वाशी रुग्णालयाला मिळाले वैद्यकीय अधीक्षक

महापालिका प्रशासनाकडून डॉ. राजेश म्हात्रे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात पदभार सुपूर्द

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्या पदोन्नतीनंतर प्रशासनाच्या केवळ तोंडी आदेशावर वैद्यकीय अधीक्षक पदाचा गाडा हाकणाऱ्या डॉ. राजेश म्हात्रे यांना महापालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात सदर पदाचा पदभार लेखी आदेशान्वये सोपवला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाला तात्पुरत्या स्वरुपात का होईना अधिकृत वाली मिळाला आहे.

महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाचा कारभार अधिकृत अधीक्षकांविना हाकला जात आहे, अशा आशयाची बातमी ‘आपलं नवे शहर'मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर बातमीची महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांची पदोन्नती झाल्यामुळे ते महापालिका मुख्यालयात वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाले. मात्र, त्यानंतर वाशी मधील प्रथम संदर्भ रुग्णालयाचा कारभार अधिकृत अधीक्षकांविना हाकला जात होता. त्याबाबत विविध स्तरातून टीका केली जात होती. रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरु असल्याचा ठपका ठेवला जात होता. ३०० बेडस्‌ची क्षमता असलेल्या प्रथम संदर्भ रुग्णालयात दररोज हजार ते दीड हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात विविध प्रकारच्या उपचाराकरिता येत असतात. मात्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्या रिवत असणाऱ्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक पदाचा अधिभार केवळ तोंडी आदेशावर डॉ. राजेश म्हात्रे सांभाळत होते. त्यांना त्याबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत पत्र किंवा लेखी आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेले नव्हते. फक्त नामधारी म्हणून डॉ. राजेश म्हात्रे रुग्णालयाचा कारभार हाकत होते.

यापूर्वी कळवा येथील रुग्णालयात रुग्णांबाबतीत झालेला हलगर्जीपणा किंवा नांदेड येथील रुग्णालयामध्ये २४ तासांत झालेला २४ रुग्णांचा मृत्यू असे प्रकार लक्षात घेता केवळ तोंडी आदेशावर वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाची धुरा वाहणे जोखमीचे होते आणि त्याबाबत विविध माध्यमातून प्रशासनावर टीकेची झोड उठत होती. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत कोणताही हेळसांडपणा होवू नये याकरिता कोणीतरी अधिकृत व्यक्ती वैद्यकीय अधीक्षक पदावर अधिकृतपणे नियुक्त होणे आवश्यक होते. संभाजीनगर, नागपूर प्रमाणे दुर्दैवी प्रकार वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या बाबतीत घडू नयेत आणि घडल्यास त्याची जबाबदारी कुणाच्या गळ्यात मारणार की एखाद्या अधिकाऱ्याला बळीचा बकरा बनवणार अशी चर्चा दबक्या सूरात सुरु होती. पण, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

३० ऑवटोबर रोजी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तोंडी आदेशावर कर्तव्य बजावणाऱ्या डॉ. राजेश म्हात्रे या मुख्य स्त्री रोग डॉक्टरांना वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधीक्षक पद लेखी आदेशान्वये दिले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गुरुवारी ठाण्यातील काही भागातील पाणी पुरवठा बंद