‘सिडको'मध्ये ‘दक्षता जनजागृती सप्ताह'चा शपथविधीने प्रारंभ

सप्ताह दरम्यान कार्यशाळांसह विविध उपक्रमांचे आयोजन

नवी मुंबई : ‘केंद्रीय दक्षता आयोग'च्या निर्देशांनुसार ‘सिडको'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘दक्षता जनजागृती सप्ताह'चा प्रारंभ ३० ऑक्टोबर रोजी झाला. ‘केंद्रीय दक्षता आयोग'च्या निर्देशानुसार ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीदरम्यान ‘सिडको'मध्ये ‘दक्षता जनजागृती सप्ताह'चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या ‘दक्षता जनजागृती सप्ताह'ची ‘भ्रष्टाचाराला विरोध करा : देशासाठी समर्पित रहा' अशी संकल्पना आहे.

या प्रसंगी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, शांतनु गोयल, डॉ. कैलास शिंदे, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, व्यवस्थापक (कार्मिक) फैय्याज खान, ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह ‘सिडको'तील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आल्यानंतर सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी उपस्थितांना सत्यनिष्ठेची शपथ दिली. तसेच ‘दक्षता सप्ताह'निमित्त ‘महाराष्ट्र'च्या राज्यपालांनी दिलेल्या संदेशाचे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे वाचन पाटील यांनी उपस्थितांसमोर केले. तद्‌नंतर ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग'चे सेवानिवृत्त अपर पोलीस उपायुवत विलास तुपे यांनी ‘भ्रष्टाचार प्रतिबंध' या विषयावर कार्यशाळा घेतली.

‘केंद्रीय दक्षता आयोग'तर्फे भ्रष्टाचार विरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह'चे आयोजन करण्यात येते. ‘आयोग'च्या मार्गदर्शनानुसार देशभरातील शासकीय, निमशासकीय संस्था आणि कार्यालयांमध्ये ‘दक्षता सप्ताह'चे आयोजन करण्यात येते. अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, समाजाच्या अशा विविध घटकांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जागृती निर्माण होऊन भ्रष्टाचाराचे निर्मुलन व्हावे, या उद्देशाने ‘दक्षता सप्ताह'चे आयोजन करण्यात येते.

‘सिडको'मध्ये ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२३ या ‘दक्षता सप्ताह' कालावधीत विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत ‘भ्रष्टाचाराला विरोध करा : देशासाठी समर्पित रहा' या विषयावर ‘सिडको'तील अधिकारी-कर्मचारी यांच्याकरिता निबंधलेखन स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा, या उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शहर स्वच्छतेवर अधिक बारकाईने निर्देश