प्रथम वेतन, मग काम; कंत्राटी कामगारांचे असहकार आंदोलन

तुर्भे विभागातील उद्याने, मोकळ्या जागा, रस्ता दुभाजक या ठिकाणी गवताचे जंगल

तुर्भे : नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग कार्यालयाच्या अंतर्गत उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांनी ‘वेतन नाही, तर काम नाही', असे असहकार आंदोलन चालू केले आहे. परिणामी तुर्भे विभागातील उद्याने, मोकळ्या जागा, रस्ता दुभाजक या ठिकाणी गवताचे जंगल माजले आहे.

महापालिका उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे तुर्भे विभाग कार्यालयाच्या अंतर्गत उद्यान विभागातील कामगारांचे पगार गेल्या २ महिन्यांपासून रखडले आहेत. वेळेवर पगार न झाल्याने ५० पेक्षा अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. महापालिका तुर्भे विभाग कार्यालयाच्या अंतर्गत सानपाडा, तुर्भे, कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६, सानपाडा पामबीच आदी भाग येतो. यामधील १२ उद्याने, १० मोकळ्या जागांवरील हिरवळ, २४ दुभाजक ठेकेदाराकडे देखभालीसाठी आहेत. यासाठी जनतेच्या करातून लाखो रुपये प्रत्येक महिन्याला ठेकेदाराला दिले जातात. मात्र, ३ महिने होत आले तरी उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांचे पगार देण्यात आले नाहीत. परिणामी मागील दोन महिन्यांपासून उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांच्या घरभाडे, दैनंदिन उदरनिर्वाह यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याप्रकरणी महापालिका उपआयुवत (उद्यान विभाग) दिलीप नेरकर यांनी २० ऑक्टोंबर या दिवशी संपर्क केला असता त्यांनी २ दिवसांत कामगारांचे पगार देण्यात यावे, असे आदेश दिल्याचे सांगितले होते. मात्र, ठेकेदाराने महापालिका उपआयुवत (उद्यान विभाग) दिलीप नेरकर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अद्यापपर्यंत पगार न झाल्याने आता उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांनीही असहकार आंदोलन चालू केले आहे. परिणामी तुर्भे परिसरातील दुभाजकांमध्ये ३ ते ४ फुटापर्यंत गवत उगवले आहे. वेळेत पाणी न दिल्याने काही ठिकाणी दुभाजकातील शोभेची झाडे जळून गेली असून, दुभाजक बोडके पडले आहेत. एपीएमसी भागात दुभाजकातील गवत रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणथळ क्षेत्र प्रमाणित करण्यास सिडको असमर्थ