ठाणे जिल्ह्यातील माती, तांदूळ घेवून अमृत कलश दिल्लीकडे रवाना

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वयंसेवकांना शुभेच्छा

ठाणे :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश' अर्थात ‘माझी माती माझा देश' या उपक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील अमृत कलश घेवून जाणाऱ्या स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. देशप्रेमाने भारावलेल्या अत्यंत उत्साही वातावरणात तसेच भारतमाता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषात आणि लेझीम पथकांच्या साथीने कलश घेवून जाणाऱ्या बसला रवाना करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, अभ्यागत उत्साहाने सहभागी झाले होते.  

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदापुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) प्रांजळ जाधव, तहसिलदार निलिमा सुर्यवंशी, संजय भोसले, आदि उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘माझी माती माझा देश' उपक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावातून, वॉर्डातून माती आणि तांदूळ गोळा करुन ते महापालिका, पंचायतसमिती आणि नगरपरिषद निहाय एका अमृत कलशामध्ये एकत्रित करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातून ६ महापालिका, नगरपरिषदचा एक आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या पंचायत समित्यांचे पाच असे एकूण १२ कलश राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानाकडे रवाना करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते कलशांचे पुजन करण्यात आले. त्यानंतर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'चे लोगो असलेला टी-शर्ट परिधान केलेल्या स्वयंसेवकांचे औक्षण करुन त्यांच्या हाती अमृत कलश देण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कार्बन क्रेडिट, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार