पनवेल महापालिकेची भरती प्रक्रिया होणार पारदर्शक

नागरिकांनी कोणत्याही आमिषांना किंवा प्रलोभनांना बळी पडूे नये -आयुवत देशमुख

पनवेल : पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण ४१ संवर्गातील गट ‘अ' ते गट ‘ड' मधील ३७७ रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा येत्या ८, ९, १०, ११ डिसेंबर रोजी ११ सत्रांमध्ये होणार आहे. सदर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक होणार आहे. दरम्यान, परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला आहे.

पनवेल महापालिका भरतीची सर्व प्रक्रिया टीसीएस कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या सदर भरती प्रक्रियेमध्ये ३७७ पदांसाठी एकुण ५४,५५८ अर्ज अंतिमतः प्राप्त झाले आहेत.

या भरती प्रक्रिये मध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती-तंत्रज्ञान सेवा, लेखा-वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा आदि विभागांतील एकुण ३७७ पदांकरिता भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार येत्या ८, ९,१० आणि ११ डिसेंबर रोजी २० जिल्ह्यामधील विविध केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे.

भरती प्रक्रियेबाबत काही समाजकंटकाच्या माध्यमातून व्हॉटस्‌ॲप द्वारे खोटे एसएमएस पाठविले जात आहे. अशा समाजकंटकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने पोलीस विभागाला पत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे भरतीबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुवत गणेश देशमुख यांनी दिली.

पनवेल महापालिका आणि टीसीएस यांनी निश्चित केलेल्या २० जिल्ह्यामध्ये विविध केद्रांवर परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षा पारदर्शी होण्याकरिता खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रावर जामर बसविण्याची सोय महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. जेणेकरुन उमेदवारांना मोबाईल, ब्लुटुथ, डिजीटल वॉचेस, आदि साधनांचा वापर करुन अनुचित प्रकार करता येणार नाही. तसेच प्रत्येक केंद्रावर सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महापालिकेचा एक नियंत्रण अधिकारी आणि एक सहाय्यक अधिकारी अशा दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेतून महापालिकेला प्रशिक्षित आणि उच्च शिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेचे आस्थापना विभाग उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे.

पनवेल महापालिकेची ३७७ पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. सदर भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने होणार असून, कृपया नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा प्रलोभनांना बळी पडू नये. भरती प्रक्रिया संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने, पदाधिकाऱ्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास याबाबत त्यांच्याविरुध्द पुराव्यासह नजिकच्या पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार दाखल करावी. परीक्षेच्या बाबतीत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. -गणेश देशमुख, आयुक्त-पनवेल महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे जिल्ह्यातील माती, तांदूळ घेवून अमृत कलश दिल्लीकडे रवाना