तुर्भे स्टोअर समोरील वाहतूक कोंडी फुटण्यास अजून १५ महिन्यांची प्रतीक्षा

उड्डाणपुलाच्या कामाला मुदतवाढ

वाशी : ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे रेल्वे स्थानकासमोर घडणाऱ्या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महापालिका तर्फे उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, सदर कामाच्या कार्यादेशाची मुदत २५ ऑक्टोबर रोजी संपली असून, या कामासाठी आता आणखी १५ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तुर्भे स्टोअर समोरील वाहतूक कोंडी फुटण्यास अजून १५ महिने तुर्भे स्टोअर मधील नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानक समोर रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, आतापर्यंत १५ व्यवतींचा जीव गेला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे तुर्भे रेल्वे स्थानक समोर उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून वारंवार करण्यात आली होती.त्यानुसार महापालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकासमोर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला असून, २०१८ साली महापालिका महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी सर्व करांसहीत सुमारे ३० कोटी ५० लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यानुसार या कामाचे कार्यादेश मे. महावीर इन्फ्रास्ट्रवचर या कंपनीस २६ एप्रिल २०२२ रोजी देण्यात आले असून, उड्डाणपूल बांधण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. सदर कामात १२५ झाडे बाधीत होत असून, ती स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. याचे सर्व सोपस्कार एप्रिल महिन्यात पार पडले आहेत. मात्र, महापालिका उद्यान विभागाच्या सुस्त कारभाराचा फटका या कामाला बसला असून, कार्यादेशाची मुदत संपली तरी झाडे स्थलांतर करण्याच्या प्रकियेला सुरुवात करण्यात आली नाही. तर दुसरीकडे या मार्गावर काम करताना वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक वळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे परवानगी मागितली आहे. मात्र, सदर परवानगी देखील अजून प्राप्त झाली नाही. त्यामुळे सदर दोन्ही प्रक्रियेअभावी तुर्भे रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला खीळ बसली असून, या कामाची मुदत २५ ऑक्टोबर २०२३ रोजी संपून देखील कामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे आता सदर ठेकेदारास २४ जानेवारी २०२५ पर्यंत आणखी १५ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तुर्भे स्टोअर समोरील वाहतूक कोंडी फुटण्यास अजून १५ महिने नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे रेल्वे स्टेशन येथील नियोजित उड्डाणपुलाच्या कामात बाधीत होणारी झाडे अजून काढली नसल्याने तसेच वाहतूक वळवण्याबाबत वाहतूक विभागाची परवानगी प्राप्त न झाल्याने तुर्भे रेल्वे स्थानकासमोर उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे या कामासाठी आणखी १५ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. - सुभाष सोनवणे, कार्यकारी अभियंता - ठाणे बेलापूर मार्ग, नवी मुंबई महापालिका.

ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे रेल्वे स्टेशन येथील नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक बदल करण्याबाबत प्रस्ताव आला आहे. त्यावर प्रत्यक्ष वाहतुकीचा आढावा घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. - तिरुपती काकडे, उपायुक्त - वाहतूक शाखा, नवी मुंबई पोलीस आयुवतालय. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण रेल्वे स्थानकाजवळ पाईप लाईनला गळती