प्रदुषण करणाऱ्या बिल्डरांना महापालिका कडून नोटीस
‘स्वच्छ नवी मुंबई शहर'चा टेंभा मिरवणारे नवी मुंबई शहर प्रदुषणाच्या विळख्यात
नवी मुंबई : शहरातील वाढते प्रदुषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पहिल्यांदाच पुनर्विकास प्रकल्पाची कामे करणाऱ्या वाशीतील दोन बांधकाम व्यावसायिकांना आवश्यक ती काळजी न घेतल्याबद्दल तसेच प्रदुषण वाढू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना न केल्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. तसेच प्रदुषण रोखण्यासाठी सात दिवसात आवश्यक त्या उपाययोजना करुन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने नोटिसीद्वारे दिला आहे.
नवी मुंबई शहरामध्ये सध्या धुलीकणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या प्रदुषणामुळे नवी मुंबई शहर धुक्यात हरवल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘स्वच्छ नवी मुंबई शहर'चा टेंभा मिरवणारे नवी मुंबई शहर प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसरीकडे नवी मुंबई शहरातील दगडखाणी बंद असल्या तरी काही ठिकाणी बांधकामासाठी लागणारे क्रशर प्लांट उभारण्यात आले आहेत. या क्रशर प्लांटमुळे निर्माण होणारे धुलीकण वातावरणात मिसळले जात आहेत. परिणामी, लोकांना श्वास घेण्यास तसेच खोकला आणि इतर प्रकारचे आजार नवी मुंबईकरांमध्ये बळावले आहेत.
त्यातच शहरामध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या कामाला वेग आला असल्यामुळे जुन्या इमारती पाडून त्या जमीनदोस्त करण्याची कामे देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे शहरातील प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुनर्विकासाची बांधकामे करताना शहरात प्रदुषण होऊ नये म्हणून महापालिकेने आपल्या परवानगी पत्रात काही अटी आणि सुचनांचे पालन करण्यास बांधकाम व्यावसायिकांना सांगितले आहे. परंतु, बांधकाम व्यावसायिकांकडून त्या उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे तसेच नियमांचे पालन करण्यात येत नसल्यामुळे शहरातील प्रदुषणाचा आलेख वाढत आहे.
नवी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्प उभारताना व्यावसायिकांकडून बांधकाम नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे शहरात प्रदुषणात वाढ होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात प्रदुषण वाढविण्यास जबाबदार असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. २५ ऑवटोबर रोजी महापालिकेने नवी मुंबई शहरात पुनर्विकास प्रकल्पाचे बांधकाम करणाऱ्या दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच त्यांना सात दिवसात बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रदुषण आणि जल प्रदुषण उपायांचे पालन करण्यास तसेच कागदोपत्री पुराव्यांसह अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदा, उपविधी आणि अधिसुचनेत नमुद तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सदर नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या बांधकाम व्यावसायिकांना प्रदुषण वाढविल्यामुळे महापालिकेने ठोठावलेला दंड खूपच कमी असल्याने बांधकाम व्यावसायिक सदरचा दंड भरुन पुन्हा जैसे थे कामे सुरु ठेवतील. त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकांना जरब बसेल अशा प्रकारचा दंड ठोठावण्यात यावा. तेव्हाच ते बांधकामांच्या नियमांचे काटेकोर पालन करतील, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाशी, सेक्टर-९ मध्ये पुनर्विकास प्रकल्पाचे काम करणाऱया मेसर्स अरिहंत अद्विका या बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार प्रति चौ.मी. १० रुपये प्रमाणे १ लाख ११ हजार २२० रुपये इतका तर वाशी, सेक्टर-२ मधील मेसर्स मिस्त्री इन्स्ट्रुमेंटस् कंपनी या बांधकाम व्यावसायिकाला ५१ हजार १५० रुपये इतका दंड ठोठावण्यात येईल, असे महापालिकेने बजावलेल्या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.