घणसोली मलनिःस्सारण केंद्र बंद प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
‘नॅटकनेवट'च्या तक्रारीवरुन नगरविकास विभागाला चौकशीचे निर्देश
नवी मुंबई : घणसोलीमधून प्रक्रिया न केलेल्या सांडपाणी थेट ठाणे खाडीत सोडण्याच्या संदर्भात पर्यावरणवाद्यांनी केलेल्तया क्रारीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये जलद गतीने विकास होणाऱ्या घणसोली येथील प्रति दिन ३७ दशलक्ष लीटर (एमएलडी) क्षमतेचा मलनिःस्सारण प्रकल्प बंद पडण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. सदर प्रकल्प उभारण्यात आलेला भूखंड विवादात अडकला आहे.
यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट ठाणे खाडीत सोडले जात असल्याने खाडीमधील जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. मलनिःस्सारण प्रकल्प वारंवार बंद पडत आहे. तो संपूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्यामुळे बहुतांश सांडपाणी खाडीत प्रवाहित होत असल्याची स्थानिक लोकांनी तक्रार केली आहे.
या संदर्भात नवी मुंबई महापालिकेतील सुत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार घणसोली गावचे रहिवासी कान्हा पाटील यांनी घणसोली, सेक्टर-१५ मध्ये असलेल्या त्यांच्या मालकीच्या भूखंडावर उभारलेल्या सदर एसटीपी प्रकल्पावर हरकत घेतली आहे. त्यांच्या आरोपानुसार ‘सिडको'ने या भूखंडाचा ताबा घेतलेला नाही. पुरेशी भरपाई देण्याची मागणी करत कान्हा पाटील यांनी मलनिःस्सारण प्रकल्प बंद पाडला आहे.
‘नॅटकनेवट'च्या तक्रारीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभाग-१चे प्रधान सचिव असीम गुप्ता यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. नगरविकास विभाग-१मध्ये सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन्ही प्राधिकरणांचा अंतर्भाव होतो. सदर समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याची आणि लोकहितासाठी नवी मुंबई महापालिकेला आपले काम यथायोग्य पध्दतीने करु देण्याची विनंती ‘नॅटकनेवट'ने ‘सिडको'ला विनंती केली आहे. २१व्या शतकातील शहरामध्ये अशा प्रकारची समस्या कायम स्वरुपी असता कामा नये, असे बी. एन. कुमार म्हणाले.
नवी मुंबई महापालिकेने घणसोली मधील सदर एसटीपी प्रकल्प सुरु करण्यासाठी पोलिसांची देखील मदत घेतली होती. परंतु, आता एक आठवड्यापेक्षा जास्त काळापासून सदर प्रकल्प बंद आहे. नवी मुंबई महापालिका ‘सिडको'च्या समन्वयाने सदर समस्येचे समाधान काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. - संजय देसाई, शहर अभियंता - नवी मुंबई महापालिका.
प्रक्रिया न केलेले पाणी ठाणे खाडीत सोडल्यामुळे खाडीतले मासे आणि खेकडेच नाही तर संपूर्ण जलचर विविधता धोक्यात आली आहे. यामुळे जैवविविधता आणि खाडीतील मासे आणि खेकडे खाणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होणार आहे. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा टाक्यांमध्ये केले जाणारे संग्रहण सुध्दा लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. -बी. एन. कुमार, संचालक - नॅटकनेवट फाऊंडेशन.
प्रक्रिया न केलेले सांडपाणी खाडीतील प्राणी आणि वनस्पतींसाठी विनाशक आहे. खरेतर मुंबईमध्ये सुध्दा बऱ्याच ठिकाणी खाडीत सांडपाणी थेट प्रवाहित केले जाते. परंतु, अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाहीत, हीच खरी खंत आहे. - नंदकुमार पवार, अध्यक्ष-वनशवती, सागरशवती संस्था.