महापालिका अतिक्रमण विभागाचा एपीएमसी परिसरात सर्जिकल स्ट्राईक

एकाचवेळी शेकडो अतिक्रमणांवर करवाई

वाशी : नवी मुंबई महापालिका उपायुक्त (अतिक्रमण) पदाची सूत्रे हाती घेताच डॉ. राहुल गेठे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. मागील आठवड्यात सीबीडी-बेलापुर मध्ये धडक कारवाई केल्यानंतर २५ ऑवटोबर रोजी वाशी मधील एपीएमसी परिसरात सर्जिकल स्ट्राईक करत महापालिका द्वारे एकाच वेळी सामाईक जागेत केलेल्या शेकडो अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई शहरात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी सामाईक जागेवर अतिक्रमण करुन त्या जागेचा व्यावसायिक वापर सुरु ठेवला होता. याबत महापालिका अतिक्रमण तसेच विभाग स्तरावर अनेक तक्रारी धूळखात पडून होत्या. मात्र, महापालिका अतिक्रमण विभागाची सूत्रे हाती घेताच डॉ. राहुल गेठे यांनी तोडक कारवाईचा सपाटा लावला आहे. मागील आठवड्यात सीबीडी-बेलापुर मधील वाढीव अतिक्रमणांवर करवाई केल्यानंतर २५ ऑवटोबर रोजी वाशी मधील एपीएमसी परिसरात सर्जिकल स्ट्राईक करत अचानक महापालिका मधील सर्व विभागवार फौजफाटा घेऊन एकाच वेळी शेकडो अतिक्रमणांवर करवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


कारवाईत बड्या प्रस्थांना सुट?
वाशी मधील एपीएमसी परिसरात सामाईक जागेचा गैरवापर करणाऱ्यांवर महापालिका अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. मात्र, सदर कारवाई दरम्यान राजकीय पाठबळ असलेल्या काही बड्या व्यावसायिकांना वगळण्यात आल्याने इतर व्यावसायिकांनी महापालिका अतिक्रमण विभागाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली.


कारवाई करताना दक्षतेचा अभाव?
एखाद्या अतिक्रमणावर कारवाई करताना कुठली जिवित हानी होऊ नये म्हणून अनधिवृÀत इमारत मनुष्य विरहित करणे तसेच सदर इमारतीची वीज जोडणी तोडणे गरजेचे असते. नवी मुंबई मधील काही इमारती जीर्ण अवस्थेत असून, धोकादायक झाल्या आहेत. मात्र, महापालिका अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई करताना काही इमारतीत नागरिक असताना कारवाई केली. तसेच एका ठिकाणी कारवाई सुरु असताना विजेचा स्फोट झाल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शी करत होते. त्यानंतर वायरमनला पाचारण करण्यात आले. त्यामुळे महापालिकाने नागरिकांसह कारवाई तोडक पथकाचा देखील जीव धोक्यात घालून सदर तोडक कारवाई केल्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकले असते?, अशी चर्चा नागरिक करीत होते. कारण ऑक्टोबर-२०२१ मध्ये नेरुळ विभागात झोपडपट्टीवर कारवाई करत असताना एक व्यक्ती झोपडीत झोपला असताना त्याचा मृत्यु झाला होता.

एपीएमसी परिसरात बऱ्याच व्यापाऱ्यांनी ‘मार्जिनल स्पेस'चा गैरवापर आणि पोटमाळे बांधून अतिक्रमण केले होते. तसेच एपीएमसी मधील गॅरेजवाल्यांनी वाहन दुरुस्तीच्या कामासाठी रस्त्याची अडवणूक केली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. म्हणूनच  ‘मार्जिनल स्पेस'चा गैरवापर करणाऱ्या, रस्ता अडवणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात आली असून, कारवाई यापुढे देखील सुरु राहील. कारवाईबाबत आरोप करणाऱ्या व्यावसायिकांच्या आरोपांची शहानिशा केली जाणार आहे. - डॉ. राहुल गेठे, उपायुक्त (अतिक्रमण) - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रदुषण करणाऱ्या बिल्डरांना महापालिका कडून नोटीस