साथरोग-किटकजन्य आजार टाळण्याकरिता काळजी घ्या

एक दिवस कोरडा दिवस पाळू, डेंग्यू ,मलेरिया आजार टाळू!

पनवेल : महाराष्ट्र शासन तसेच सहाय्यक संचालक आरोग्य विभाग उपसंचालकांच्या सुचनेप्रमाणे ‘बुधवार'चा दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी ‘बुधवार'चा दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन  आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

सध्या सर्वत्र डेंगू ,मलेरिया सारख्या साथजन्य रोगाचे रुग्ण दिसून येत आहेत  या पार्श्वभूमीवर वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत किटकजन्य आजराविषयी खबरदारी घेण्यासाठी जनजागृती विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सुचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे.

पावसाळ्यांनंतर विविध किटकजन्य रोगाचे प्रमाण वाढत असते. अशा वेळी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच भाज्या, फळे आदि वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केरकचरा घंटा गाडीतच टाकावा. घर अणि सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी. साचलेले पाणी, डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल, अशी सोय करावी. जेणेकरुन डास उत्पन्न होणार नाहीत. शिळे आणि उघड्यावरचे अन्न खाऊ नये, विहिरीचे पाणी शुध्दीकरण करुनच पिण्यास वापरावे. अतिसार झाल्यास क्षारसंजीवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी मनीप्लँट, वॉटरकुलर यामधील पाणी आठवड्यातून एक दिवस बुधवारी पूर्णपणे काढून कोरडे करुन ‘कोरडा दिवस' पाळावा, अशा सूचना महापालिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.

जेवणापूर्वी आणि शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पूर्ण शिजवेले, ताजे अन्न खावे. रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खावू नये. ताप सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणे असल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

हिवताप, डेंगू, मेंदूज्वर, चिकनगुनिया, मलेरिया असे साथीचे रुग्ण आपल्या आसपास आढल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णालयांनी, प्रयोगशाळांनी साथीच्या रोगाचे रुग्ण महापालिकेला    [email protected]  या ई-मेलवर कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. -डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 महापालिका अतिक्रमण विभागाचा एपीएमसी परिसरात सर्जिकल स्ट्राईक