राज्यगीताच्या सलामीने ठाणे शहराचा अमृत कलश मुंबईकडे रवाना

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते ‘अमृत कलश'चे हस्तांतरण

ठाणे :  लेझीमचा ठेका... पारंपारिक वेशभूषेत सुहासिनींनी अमृत कलशाचे केलेले पुजन... सोबतीला अग्निशमन, टीडीआरएफ आणि सुरक्षारक्षकांनी राज्यगीताने दिलेली सलामी... अशा उत्साही आणि मंगलमय वातावरणात ठाणे शहरातून गोळा केलेल्या माती आणि तांदुळ यांनी भरलेला अमृतकलश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आला.

‘माझी माती , माझ देश' अभियानात ‘अमृत कलश यात्रा' अंतर्गत अमृत कलश हस्तांतरण कार्यक्रम महापालिका मुख्यालयाच्या आवारात  पार पडला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्तेसर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ठाणे शहरात देखील १५ ऑगस्ट पूर्वीपासून कार्यक्रम राबविले गेले. या सर्वांची सांगता शहरातील विविध भागात ‘अमृत कलश यात्रा'द्वारे करण्यात आली. या यात्रेत नागरिकांनी तांदूळ आणि माती या अमृतकलशात जमा करुन ‘अभियान'ला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी ठाणेकर नागरिकांचे आभार व्यक्त केले. यावेळी अमृत कलश दिल्लीला घेवून जाणाऱ्या कुणाल सुनील मातेले, ओमकार संतोष चोरट या स्वयंसेवकांकडे आयुक्त बांगर यांनी हस्तांतरीत केला. तद्‌नंतर फुलांनी सजविलेल्या परिवहनच्या बसमधून अमृतकलश सन्मानपूर्वक रवाना करण्यात आला.

अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालय येथून मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे २६ ऑवटोबर रोजी सायंकाळी रवाना झाला. त्यानंतर अमृत कलश विशेष ट्रेनने मुख्यमंत्र्याच्या हस्ते दिल्ली येथे रवाना होणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात ठाणे शहरातील राबोडी येथील सरस्वती हायस्कूल ॲन्ड कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच ‘ठाणे'मधील ‘सखी महिला ग्रुप'ने लेझीम सादर केले. तर ठाणे महापालिकेचे आरक्षक योगेश विसपुते यांनी पोवाडा सादर करुन संपूर्ण वातावरण भारावून टाकले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 साथरोग-किटकजन्य आजार टाळण्याकरिता काळजी घ्या