एपीएमसी घाऊक बाजारात कांदा दराची पन्नाशी पार

लहरी हवामानाचा कांदा उत्पादनाला फटका

वाशी : यंदा राज्यात पावसाला दीड महिने उशिराने सुरुवात झाल्याने कांद्याचे उत्पादन लांबले आहे. त्यामुळे बाजारात नवीन कांद्याची आवक घटल्याने कांदा दरात वाढ होत चालली आहे. वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केटमध्ये मागील दहा दिवसांपासून कांदा दर रोज उसळी घेत असून, २६ ऑवटोबर रोजी कांदा दराने पन्नाशी पार केली आहे. एपीएमसी बाजारात २६ ऑवटोबर रोजी कांदा ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला असून, कांदा दरात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

राज्यात पाऊस उशिरा दाखल झाल्याने कडक उन्हामुळे शेतकऱ्यांनी लावलेली कांद्याची पहिली लागवड वाया गेली. त्यामुळे लहरी हवामानाचा कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. आता कांद्याची नवीन लागवड करण्यात आली असून, नवीन लागवडीचा कांदा काढणीला अजून एक ते दीड महिना लागणार आहे. त्यामुळे बाजारात नवीन कांद्याची आवक रोडावली आहे. सध्या बाजारात जुना कांदा दाखल होत असून, त्याचा दर्जा मध्यम आहे. नवीन कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाजारात कांद्याची आवक घटत  चालली असून, कांदा दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दहा दिवसांपूर्वी वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात कांद्याचे दर २० ते २५ रुपये प्रतिकिलो होते. मात्र, आता कांदा दरात वाढ होऊन २६ ऑवटोबर पर्यंत कांदा दर दुपटीने वाढले आहेत. २६ ऑवटोबर रोजी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात ७७ गाडी कांदा आवक झाला असून, कांदा ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला.

दरम्यान, एपीएमसी बाजारात नवीन कांदा दाखल होईपर्यंत काही दिवस बाजारात कांदा आवक कमी राहणार असून, ऐन सणासुदीला दर आणखी वाढून कांदा ग्राहकांना चांगलाच रडवणार आहे, अशी शक्यता वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केट मधील व्यापारी विनोद निकम यांनी व्यक्त केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्यगीताच्या सलामीने ठाणे शहराचा अमृत कलश मुंबईकडे रवाना