‘मेट्रो'चे उद्‌घाटन पुन्हा रखडले

‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन पुन्हा लांबणीवर  

नवी मुंबई : येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन पुन्हा अनिश्चित कालावधी पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्‌घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहिर करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्‌घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून ‘तारीख पे तारीख' दिली जात असल्यामुळे राज्य शासनासह सिडको आणि रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी हवालदिल झाले आहेत.  

येत्या ३० ऑक्टोबर रोजी ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्‌घाटनासाठी आणि ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान'च्या शुभारंभानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य नवी मुंबई दौरा घोषित करण्यात आला होता. तशा सूचना सिडको आणि रायगड जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्यामुळे या दोन्ही कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी नवी मुंबईतील विविध शासकीय प्राधिकरणांकडून सुरू झाली होती.

सिडको व्यवस्थापनाने नवी मुंबई मेट्रो आणि नमो महिला सशक्तीकरण अभियान या कार्यक्रमांकरिता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर एक लाख महिला उपस्थित राहतील असे गृहित धरुन आवश्यक ती मंडप उभारणी आणि इतर सोयी-सुविधा पुरविण्याकरिता किमान पाच कोटी खर्च अपेक्षित धरुन निविदा देखील काढल्या आहेत. तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंत्रालयस्तरावर तसेच सिडको आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर विविध बैठका देखील घेण्यात आल्या. परंतु, पंतप्रधानांचा ३० ऑक्टोबर रोजीचा संभाव्य दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे संदेश पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य शासनासह सर्व आयोजकांच्या मोबाईलवर धडकला.

ऐन दिवाळीत पंतप्रधानांनी नवी मुंबईचा दौरा आखू नये...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने अधिकारी वर्गाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या संभाव्य दौऱ्यामुळे नवरात्री आणि विशेष करुन दसरा सण कुटुंबासोबत साजरे करणे या अधिकाऱ्यांना शक्य झाले नसते. तसेच ३० ऑक्टोबर रोजीचा संभाव्य दौरा पुढे गेला असला तरी ऐन दिवाळीत पंतप्रधानांनी नवी मुंबईचा दौरा आखू नये, अशी मनोमन प्रार्थना या अधिकारी वर्गाकडून देवाकडे केली जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी घाऊक बाजारात कांदा दराची पन्नाशी पार