घणसोली मलनिःस्सारण केंद्रातून ठाणे खाडीत प्रदुषण

प्रक्रिया न केलेले सांडपाणी दररोज थेट ठाणे खाडीत प्रवाहित

नवी मुंबई : ३७ दशलक्ष लिटर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी दररोज थेट ठाणे खाडीत प्रवाहित केले जात असल्याची तक्रार पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने चालवले जाणारे घणसोेली येथील मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे नागरिकांच्या आरोग्याचा विषय बनला आहे.

विषारी पाणी खाडीत शिरल्यामुळे, त्याचा जैवविविधता आणि समुद्री जीवनावर घातक परिणाम होत असल्याचा ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

एसटीपी प्रकल्प असलेल्या जमिनीवर कान्हा पाटील यांनी मालकीचा दावा केल्यामुळे प्रकल्पावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. सदर भूखंड घणसोली, सेक्टर१५मध्ये येतो. या भागात बराच विकास झालेला आहे. ‘सिडको'ने आपल्याला कोणतीही भरपाई दिलेली नाही,असा दावा कान्हा पाटील यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी एसटीपी प्रकल्प बंद पाडला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सदर जागा वादाचे लवकरात लवकर निराकरण करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बी. एन. कुमार यांनी केली आहे.

दरम्यान, नवी मुंबई शहरामध्ये दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या बी. एन. कुमार यांनी घणसोली आता महत्वपूर्ण रिअल इस्टेट स्थानांपैकी एक बनत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने केलेल्या तक्रारीला नवी मुंबई महापालिकेने प्रतिसाद दिला आहे. घणसोली येथील एसटीपी वारंवार बंद पडत आहे. तसेच महापालिका एसटीपी प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. - संजय देसाई, शहर अभियंता - नवी मुंबई महापालिका.   

गेल्या वर्षीच्या जूनमध्ये ‘सिडको'ने प्रसिध्द केलेल्या निविदेनुसार घणसोली मधील भूखंडाची किंमत प्रति चौरस मीटर ३ लाखांहून देखील जास्त होती. अति उंच व्यावसायिक आणि रहिवासी काँप्लेक्सचे या भागात निर्माण करताना ‘सिडको'ने एसटीपी समस्येची साधी दखल देखील घेतली नाही, सदर बाब अतिशय धक्कादायक आहे. -बी. एन. कुमार, संचालक-नटकनेवट फाऊंडेशन.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हरित कचरा उचलणाऱ्या वाहनांचा अवैध वृक्ष तोडीमध्ये सहभाग?