संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या तैलचित्राचे घाणेकर नाट्यगृह येथे अनावरण
पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. ओंकार गुलवाडी, विजय गोखले यांच्या हस्ते झाले अनावरण
ठाणे : चतुरस्त्र गायक आणि ठाण्याचे भूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले. पं. मराठे यांच्यासह काम केलेले ज्येष्ठ ऑर्गनवादक पं. विश्वनाथ कान्हेरे आणि ज्येष्ठ तबला वादक पं. ओंकार गुलवाडी तसेच, निर्माते, अभिनेते व सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विजय गोखले यांच्या हस्ते पं. राम मराठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात पं. राम मराठे यांचे चिरंजीव संजय मराठे, मुकुंद मराठे, मुलगी सुशीला ओक, जावई रघुवीर ओक आणि कुटुंबीय, तसेच, ज्येष्ठ कलाकार मारुती पाटील, पं. मुकुंदराज देव, पं. विवेक सोनार, गायिका हेमा उपासनी, रवी नवले, पं. राम मराठे यांचे तैलचित्र साकारणारे चित्रकार किशोर नादावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पं. राम मराठे यांची जन्मशताब्दी आजपासून (२३ ऑक्टोबर) सुरू होत आहे. ते औचित्य साधून त्यांच्या तैलचित्राचे अनावरण ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले. त्यासाठी पं. कान्हेरे बुवा आणि पं. ओंकार गुलवाडी यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार, तसेच, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले उपस्थित राहिले. ही सांस्कृतिक ठाण्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. पं. राम मराठे यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहे, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी याप्रसंगी केले.
तर, आजचा दिवस भाग्याचा आहे. पितृतुल्य गुरूजी पं. राम मराठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले, त्यांच्यासह काम करण्याचा मान मिळाला. त्यांनी मला घडवले. खपू मोठा कलाकार, चतुरस्त्र गायकाचे ठाण्यात निवासस्थान होते हे ठाणेकरांचेही भाग्य आहे, अशा भावना पं. विश्वनाथ कान्हेरे यांनी व्यक्त केल्या. प्रयोग संपल्यावर जेवायला बसलो की ते दहीभात स्वत: कालवून खाऊ घालायचे. माझ्यावर त्यांनी पृतवत प्रेम केले, असेही कान्हेरे यांनी सांगितले.
संगीतभूषण, अखिल संगीत विश्वाचे गानवैभव असलेले पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे ठाणे महापालिकेने योजले ही सर्व संगीत प्रेमींसाठी अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. पं. राम मराठे यांच्या लोकिकाला साजेसे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे रहावे. अधिकारी मंडळींनी त्याबद्दल विचार करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी केले. रंगशारदा या गोखले यांच्या निर्मिती संस्थेच्या नाटकात पं. राम मराठे यांनी भूमिका केल्या होत्या.
याप्रसंगी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या हस्ते पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. ओंकार गुलवाडी, विजय गोखले, संजय मराठे, मुकुंद मराठे, सुशीला ओक आणि चित्रकार किशोर नादावडेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुकुंद मराठे यांनी नाट्यगीताची झलक सादर करीत या छोटेखानी सोहळ्याची सांगता केली.