‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्घाटनाला मिळाला मुहूर्त
पंतप्रधान मोदी यांच्याकडून ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान'चाही शुभारंभ
नवी मुंबई : बहुप्रतिक्षीत ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्घाटना अखेर मुहूर्त मिळाला आहे. ३० नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्घाटन केले जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्घाटन होण्याकरिता एकाच महिन्यात पंतप्रधानांचा तिसरा संभाव्य दौरा नवी मुंबईत आयोजित केला जात आहे. यापूर्वी १३ आणि १४ ऑक्टोबर, त्यानंतर १७ ऑक्टोबरची तारीख ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्घाटनासाठी निश्चित केली जात होती. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आजतागायत उद्घाटनाचा योग जुळून आलेला नाही. त्यामुळे येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य नवी मुंबई दौरा आखण्यात येत आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनासह नवी मुंबईतील विविध शासकीय प्राधिकरणे पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी करण्यात गुंतले आहेत.
विशेष म्हणजे ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्घाटनासह त्याच दिवशी राज्य शासनाद्वारे ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान'चा शुभारंभ नवी मुंबईतून केला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर आयोजित या ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान'च्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित महिलांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे. या महिला मेळाव्यास संपूर्ण राज्यातून विविध महिला बचत गटातील १ लाखाहून अधिक महिला उपस्थित राहण्याकरिता शासन यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत.
‘नमो महिला सशक्तीकरण अभियान'च्या शुभारंभाची आणि ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्घाटनाची तयारी करण्यासाठी २१ ऑवटोबर रोजी खारघर येथील गोल्फ कोर्सवर सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्घाटनाची तयारी करण्याची जबाबदारी संपूर्णपणे सिडको व्यवस्थापनावर असणार आहे. तर जिल्हाधिकारी रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान'च्या शुभारंभाची तयारी ‘महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)' आणि ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (एमएसआरएलएम-उमेद)' आदि शासकीय प्राधिकरणे करणार आहेत.
१६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे आप्पासाहेब धर्माकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन खारघर येथे करण्यात आले होते. या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. भरउन्हात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे त्यादिवशीच्या उष्माघातात १४ हुन अधिक श्री सदस्यांचा नाहक बळी गेला. सध्या ऑक्टोबर हिटचा उकाडा नागरिकांना असह्य होत आहे. असे असताना ऑक्टोबर हिट या कालावधीतच ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान'च्या शुभारंभाच्या अनुषंगाने एक लाखांहुन अधिक महिलांना एकत्र आणणे कितपत संयुवितक ठरेल? याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
‘नेरुळ-उरण रेल्वे' सेवेचे २६ किंवा ३० ऑवटोबर रोजी लोकार्पण?
रेल्वे प्रशासनाकडून पाठपुरावा सुरु
३० ऑवटोबर रोजी ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान'च्या शुभारंभवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नवी मुंबई मेट्रो'च्या उद्घाटनासाठी राज्य शासनाने प्रयत्न चालविले आहेत. पण, गेल्या अनेक वर्षांपासून ‘रेल्वे'च्या प्रतिक्षेत असणारे उरणकर देखील नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. नेरुळ ते उरण या रेल्वे मार्गातील नेरुळ ते खारकोपर अशी पहिल्या टप्प्यातील लोकल सेवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील खारकोपरच्या पुढे उरण पर्यंतची लोकल सेवा सुरु होण्यासाठी उरणकर नागरिक जवळपास मार्च २०२३ पासून प्रतिक्षेत आहेत. या मार्गावरील गव्हाण वगळता सर्वच रेल्वे स्थानके प्रवासी सेवेसाठी सज्ज आहेत. नेरुळ-उरण रेल्वे सेवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करावयाचा असल्याने या मार्गातील बरीचशी तांत्रिक कामे देखील रेल्वे प्रशासनाकडून युध्द पातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. या मार्गाच्या उद्घाटनासाठी रेल्वे मंत्रालयाकडून पंतप्रधान कार्यालयाशी देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. परंतु, उद्घाटनासाठी पंतप्रधानांकडून वेळ देण्यात आलेला नाही. त्यामुळे एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑवटोबर रोजी शिर्डी येथे तर ३० ऑवटोबर रोजी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पस्थळी ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान'च्या शुभारंभावेळी येणार असल्याने या कार्यक्रमांचे औचित्य साधून रेल्वे प्रशासन पंतप्रधानांच्या हस्ते ‘नेरुळ-उरण रेल्वे' मार्गाचे उद्घाटन करुन घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी पाठपुरावा करीत असल्याचे सुत्रांकडून समजते.