पावसाळ्यानंतरच्या स्वच्छतेकडे महापालिकेचे लक्ष

शहरात विविध ठिकाणांना भेटी देत आयुक्त नार्वेकर यांचे स्वच्छता कार्याला गती देण्याचे निर्देश

नवी मुंबई : पावसाळा सरल्यानंतरच्या कालावधीत शहर आयुक्त राजेश नार्वेकर यांचे  देत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे विभागातील विविध ठिकाणांना भेटी देत स्वच्छता कार्याला अधिक प्रभावीपणे गती देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड तसेच विभाग अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पावसामुळे रस्त्यांच्या कडेला आणि दुभाजकांमध्ये मोठया प्रमाणावर गवत अस्ताव्यस्त वाढलेले दिसत असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही रस्त्यातील रहदारीला आणि वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा आणत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने उद्यन विभागाने प्राधान्याने मुख्य रस्ते, त्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरील दुभाजक आणि रत्याच्या कडेला वाढलेले गवत काढून घ्यावे. तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांदयांची पुरेशा प्रमाणात छाटणी करावी. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सातत्याने रहदारी सुरु असते. त्यामुळे धूळ आणि बारीक मातीही दुभाजकांच्या कडेला खालच्या बाजुला साचून राहते. त्याच्या साफसफाईकडे रहदारीचे प्रमाण कमी असते अशा वेळी प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिल्या.

सानपाडा येथे उड्डाणपुलाखाली बनविलेला गेमींग झोन अशी नवी मुंबई महापालिकेची वेगळी संकल्पना राष्ट्रीय पातळीवर नावाजली गेली असून त्याठिकाणच्या स्वच्छता-देखभालीकडे बारकाईने लक्ष द्यावे. तेथे खेळायला येणाऱ्या मुलांशी चर्चा करुन त्यांना आवश्यक असणाऱ्या पूर्तता करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच सदर ठिकाणी प्रशिक्षकांमार्फथ काही खेळांचे प्रशिक्षण देता येणे शक्य आहे काय? याचीही तपासणी करण्याचे आयुवतांनी सूचित केले. अशाच प्रकारे कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानात निर्माण केलेला स्वच्छता पार्क उपक्रमही माहिती-ज्ञानाच्या दृष्टीने अतिशय अभिनव असल्याचा नावलौकिक देश पातळीवर झालेला असून यामध्ये काळानुरुप बदल करण्याच्या दृष्टीने आणि तो डिजीटल युगाला साजेसा अद्ययावत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.

यावेळी काही ठिकाणांची पाहणी करण्यासोबतच शहरातून फिरत असताना अनेक ठिकाणी थांबून आयुक्तांनी तेथील स्वच्छतेवर अधिक बारकाईने लक्ष देण्याचे सूचित केले. तसेच विविध ठिकाणच्या शिल्पाकृती, आय लव्ह नवी मुंबई पॉईंटस्‌ दुरुस्त करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी निसर्गोद्यानाशेजारील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टला भेट देत तेथील कार्यप्रणाली सुयोग्य रितीने कार्यान्वित असल्याची आयुक्तांनी पाहणी केली. येथील पुर्नप्रक्रियाकृत पाणी उद्योगसमुहांना पुरविले जात असून २० द.ल.लि. प्रकल्प क्षमतेपैकी ८ द.ल.लि. पुर्नप्रक्रियाकृत पाणी उद्योग समुहांच्या वापरासाठी पुरविण्यात येत आहे. सद्यस्थितीत या पुर्नप्रक्रियाकृत पाण्यातून शहरातील बागा फुलविल्या जात आहेत. सदर सर्वच्या सर्व पाणी उद्योग समुहांना वापरण्यास देऊन पिण्याच्या पाण्याची बचत करणे आणि या पाणी विक्रीतून महापालिकेला निधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जात आहे.

नवी मुंबईने शहर स्वच्छतेत सातत्य राखल्याने तसेच स्वच्छतेच्या नवनवीन संकल्पना राबविल्याने नवी मुंबईकडून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. त्यामुळे या अपेक्षांची परिपूर्ती करुन नवी मुंबईकर नागरिकांना सुखद अनुभूती मिळेल आणि नवी मुंबईला भेटी देणाऱ्या पाहुण्यांना आणि पर्यटकांनाही स्वच्छतेमधील नवी मुंबईचे वेगळेपण जाणवेल, अशी आता आपली सामुहिक जबाबदारी झाली आहे. त्याकरिता महापालिकेच्या यंत्रणेने कायम सतर्क राहून सातत्य राखून काम केले पाहिजे. -राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निर्माणाधीन बांधकामावरील क्रेन कोसळली; १ कामगार जखमी