ठाणे महापालिका आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेतील दहावे पुष्प

आपल्यातील ‘मी' सोबत अंतर्मुख अन्‌ बर्हिमुख व्हायला हवे -डॉ. आनंद नाडकर्णी

ठाणे : आपल्यातील ‘मी' पणाची जाणीव विचारांमधून तयार होत असते. ‘मी' अनेक वैशिष्ट्यांनी लगडलेला असा जीव आहे, ते आत्मस्फुरण जेव्हा येते तिथूनच माणसाच्या माणूसपणाला सुरुवात होते म्हणून माणसातील ‘मी' महत्वाचा आहे. ‘मी' जर नसेन तर काहीच नसेन म्हणूनच ‘मी'ची सुरुवात झाली. माणसाच्या आतल्या ‘मी'ला जेव्हा बाहेरच्या ‘मी'ला मिळतो तेव्हा नाती तयार होवून ‘आम्ही' तयार होतो. तसेच माणसाच्या आतल्या ‘मी'ला जेव्हा आतलाच ‘मी' मिळतो तेव्हा माणसामध्ये अहंम भाव तयार होतो. माणसाला त्याच्यातील आतल्या ‘मी'ला  बाहेरच्या ‘मी' सोबत जोडण्यासाठी बर्हिःमुख होता आले पाहिजे आणि आतल्या ‘मी' सोबत अंतर्मुख होता आले पाहिजे. बर्हिःमुखता आणि  अंतर्मुखता याचा समतोल व्यक्तिमत्वामध्ये माणसाला साधता येणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट मत मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मांडले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे महापालिका आयोजित विचारमंथन या व्याख्यानमालेतील दहावे पुष्प प्रख्यात मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीने गुंफले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘या मी मी च काय करायचं' या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी निवेदिका हर्षदा बोरकर यांनी ओघवत्या शैलीत संवाद साधला. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते डॉ. आनंद नाडकर्णी, निवेदिका हर्षदा बोरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे उपस्थित होते.

माणसाची त्याच्यातील आतल्या ‘मी' सोबत मैत्री व्हावी यासाठी मानसशास्त्र आणि अध्यात्म दोन्ही काम करत आहेत. माणसाचा आतल्या ‘मी' सोबत चांगला संवाद झाला तर माणूस हा प्रगतीकडे जात असतो. माणूस निसर्गाचाच भाग आहे, माणसांकडे निरीक्षणासाठी असलेली दृष्टी जर त्याने योग्य पध्दतीने वापरली तर माणूस निसर्गाकडून खूप काही शिकू शकतो. निसर्गामध्ये दोन झाडे एकमेकांशी भांडताना आपण पाहिलेले नाही. निसर्गाचे अवलोकन परंपरेमध्ये सुध्दा मांडले गेली आहे. निसर्ग आपल्याला उत्पत्ती, स्थिती, लय देतो तसा निसर्ग विनाशाची शक्ती सुध्दा दाखवतो. निसर्ग वैविध्याचा स्वीकार करतो, उच्च-नीचता माणसाने आणली, तेव्हा माणसाने भेद निर्माण केला असल्याचेही डॉ. नाडकर्णी यांनी यावेळी नमूद केले.

माणसातील गुणवैशिष्ट्य बाहेर काढणारी माणसे आजुबाजुला असणे आवश्यक आहे. अंगभूत क्षमता, संस्कार, संस्कृती या तिघांच्या सहयोगातून जे तयार होते, ते माणसाचे वैशिष्ट्य असते. माणसातील अंगभूत कला कळणे सुध्दा एक प्रक्रिया असते. माणूस आपल्यातील ‘वेगळेपण' समजून न घेता एकमेकांशी स्पर्धा करणे ‘मी' चा भाग असल्याचे डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले. माणसाने स्वतःतील आणि समोरच्या माणसामधील वेगळेपणाचाही सन्मान करायला हवा. जेव्हा माणसातील परस्पर अनुबंध जागा होतो, तेव्हा सहकार्याचे रुपांतर सहयोगामध्ये होत असल्याचे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले.

तब्बल दीड तास रंगलेल्या या मुलाखतीस ठाणेकर नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, ‘जोशी बेडेकर कालेज'चे ग्रंथपाल नारायण बारसे, मुक्त पत्रकार मकरंद जोशी, पत्रकार प्रशांत मोरे, पत्रकार अनुपमा गुंडे, प्रज्ञा सोपारकर, प्रज्ञा म्हात्रे, पूर्वा साडविलकर, ‘रिस्पॉन्सबिल नेटीझन'चे उन्मेष जोशी, ‘इंद्रधनु'चे रवींद्र अमृतकर, ‘ब्रह्मांड सांस्कृतिक कट्ट्या'चे राजेश जाधव तसेच ठाण्यातील साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळ्यानंतरच्या स्वच्छतेकडे महापालिकेचे लक्ष