लहरी हवामानाचा कांदा उत्पादनाला फटका

ऐन सणासुदीला कांदा ग्राहकांना चांगलाच रडवणार

वाशी : राज्यातील लहरी हवामानाचा कांदा उत्पादनाला फटका बसला असून, नवीन कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाजारात कांद्याची आवक घटल्याने दरवाढीचा आलेख चढताच आहे. वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा- बटाटा बाजारात १६ ऑवटोबर पासून १८ ऑवटोबर पर्यंत १० ते १४ रुपयांनी कांदा वधारला असून, आगामी सणासुदीला कांदा ग्राहकांना चांगलाच रडवणार असल्याची शक्यता कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ऐन पावसाळ्यात राज्यातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. कधी जोराचा पाऊस तर कधी कडक उन. त्यामुळे ऐन कांदा उत्पादनाच्या दिवसात दोन-दोन वेळा कांद्याचे उत्पादन वाया गेले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आहे. वाशी एपीएमसी मधील कांदा-बटाटा बाजारात १६ ऑवटोबर पासून कांदा आवक कमी होत असून, १८ ऑवटोबर रोजी ८३ गाड्या कांदा आवक झाली. त्यातही हॉटेल व्यवसायिकांकडून अधिक मागणी असलेला उच्च प्रतीचा कांदा अल्प प्रमाणात दाखल होत आहे. तर मध्यम प्रतीचा हलका कांदा अधिक दाखल होत आहे. मात्र, चांगला कांदा कमी येत असल्याने हलक्या कांद्याचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात उच्च प्रतीचा कांदा २२ ते २४ रुपये आणि हलका, मध्यम कांदा १६ ते १८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. मात्र, १८ ऑवटोबर रोजी उच्च प्रतीचा कांदा ३६ ते ३८ रुपये प्रतिकिलो दराने आणि हलक्या प्रतीचा मध्यम कांदा २८ ते ३१ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला.

दरम्यान, आगामी काही दिवस बाजारात कांदा आवक कमी राहणार असून, ऐन सणासुदीला कांदा ग्राहकांना चांगलाच रडवणार आहे, अशी शक्यता एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा व्यापारी वर्तवित आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण विभागीय माहिती कार्यालय तर्फे ‘अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिका'ची निर्मिती