‘जागतिक बँक'च्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा

ठाणे : राज्यातील जिल्ह्यांची आर्थिक वाढ आणि संस्थात्मक क्षमता वाढीस लागण्यासाठी ‘जागतिक बँक'च्या सहकार्याने महाराष्ट्र जिल्हा वाढ-संस्थात्मक क्षमता प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ‘जागतिक बँक'च्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सांख्यिकी कार्यालयास भेट दिली. यावेळी या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याबरोबर विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

‘जागतिक बँक'चे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ थॉमस डॅनियलविझ, सिंगापूर मधील राष्ट्रीय सांख्यिकीमधील तज्ञ प्रा. पौल चुंग, ‘जागतिक बँक'च्या तज्ञ श्रेया दत्ता-मिश्रा या यांनी १८ आवटोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, ‘अर्थ-सांख्यिकी संचालनालय'चे सहसंचालक अमोल खंडारे, कोकण विभागाचे उपायुक्त (नियोजन) प्रमोद केंभावी, विभागीय सहसंचालक सीमा जोशी, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विजू शिरसाट, जिल्हा सांख्यिकी अधिकारी संगीता मोरे, ‘मुंबई अर्थशास्त्र संस्था'चे प्रा. सुरेश मैद, सहायक नियोजन अधिकारी भारत साळुंखे, आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील विदा (डाटा) परिस्थितीकीय व्यवस्था (इकोसिस्टिम), विदाचे संकलन, त्याचा संस्थात्मक प्रवाह, वापर, विदाची अनुउपलब्धता दूर करण्यासाठीचे उपाय, विदा जमा करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना आदिंविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रासाठीचे जिल्ह्यातील वातावरण, सांख्यिकी माहिती संकलित करण्याच्या पध्दती, जिल्ह्यातील योजनांच्या अंमलबजावणीत सांख्यिकी माहितीचे महत्त्व, नवीन उद्योगांसाठी राबविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आदिंबाबत माहिती दिली. ‘जागतिक बँक'च्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचेही त्यांनी निरसन केले.

बैठकीनंतर ‘जागतिक बँक'च्या प्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयास भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील सुविधा प्रकल्प, समस्यांबाबत खा. राजन विचारे यांनी जाणली सद्यस्थिती