श्रीमहालक्ष्मी व्रतासोबत महाकालीची उपासनाही आवश्यक !

सध्याची देशाची, समाजाची स्थिती पाहता कोणत्याच क्षेत्रात महिला सुरक्षित नाहीत. स्त्री अत्याचारांच्या घटना सतत वाढत असून शहर असो वा खेडे, गरीब असो वा श्रीमंत, शाळकरी कन्या असो वा वयोवृद्धा वासनांधांच्या विखारी नजरांपासून आज कोणीच सुरक्षित नाहीत. दर मिनिटाला देशात कुठल्या ना कुठल्या ठिकाणची स्त्री अत्याचाराला बळी पडू लागली आहे. देवीच्या महाकाली स्वरूपात तिच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे. या शस्त्रांचा वापर करून तिने सज्जनांचे रक्षण, दृष्टांचा संहार केला आहे. देवीच्या या रूपाची उपासना आज प्रत्येकी स्त्रीने करायला हवी.        

सध्या मार्गशीर्ष महिना सुरु आहे. या महिन्यातील गुरुवारी बहुतांश महिला श्री महालक्ष्मी व्रत करतात. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. चौरंगावर श्री महालक्ष्मीच्या रूपाने कलश मांडून तिची मनोभावे पूजा केली जाते. सुगंधी फुलांचा गजरा किंवा वेणी माळली जाते. देवीसमोर श्री महालक्ष्मी व्रताची कथा आणि महती महिती यांचे वाचन केले जाते. देवीची आरती केल्यावर देवीला पाच फळांचा नैवेद्य दाखवला जातो. गेल्या काही वर्षांपासून पूजेच्या कलशावर देवीचा मुखवटा लावून त्यावर वस्त्र आणि दागिने यांची सजावट करण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. अनेक महिला हौस म्हणून पूजेच्या चौरंगाभोवती आकर्षक फुलांची सजावट करतात, दाराबाहेर रांगोळी काढून दारात पणत्या लावतात. नैवेद्यासाठी गोडधोड बनवतात. महाराष्ट्रात बहुतांश प्रांतात महिला हे व्रत करत असून वर्षागणिक व्रत करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढच होत आहे.

शहरासारख्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलाही वेळात वेळ काढून हे व्रत करतात. येणारा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील अखेरचा गुरुवार असणार आहे. या दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले जाते त्यानिमित्ताने सवाष्ण महिलांना वाण, गजरा अथवा फुल आणि हळद कंकू दिले जाते. श्री महालक्ष्मी देवीप्रती असलेली श्रद्धा याबरोबरच महालक्ष्मी देवीची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहावी हा सकाम हेतूही  या व्रतामागे दडलेला असतो.

शालेय जीवनात ज्ञानार्जन करून आपण श्री सरस्वती देवीची उपासना करत असतो. अनेक महिला आज उच्च शिक्षण घेऊन न्याय, वैद्यक, संशोधन, सैन्य, पोलीस आदी सर्वच क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. उद्योजक क्षेत्रातही अनेक महिलांनी आज उत्तुंग भरारी घेतली आहे. राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढू लागला आहे. त्या त्या क्षेत्रातील ज्ञान घेऊन त्यामध्ये पारंगत होणे ही श्री सरस्वती देवीची उपासनाच आहे. शक्तीची अर्थात देवीची तीन प्रमुख रूपे आहेत. त्यांतील श्री सरस्वती आणि श्री महालक्ष्मी या देवीच्या तारक रूपाची उपासना आपण प्रत्येक जण करत आपापल्या परीने करत असतो; मात्र देवीच्या ज्या रूपाच्या उपासनेची आज नितांत आवश्यकता आहे त्या भक्तांच्या उद्धारासाठी दृष्टांचा संहार करणाऱ्या महाकालीची उपासना महिलावर्ग केव्हा करणार आहे ? सध्याची देशाची आणि समाजाची स्थिती पाहता कोणत्याच क्षेत्रात महिला सुरक्षित नाहीत. स्त्री अत्याचारांच्या घटनांमध्ये वर्षागणिक कमालीची वाढ होऊ लागली आहे. शहर असो वा खेडे, गरीब असो वा श्रीमंत, शाळकरी कन्या असो वा वयोवृद्धा वासनांधांच्या विखारी  नजरांपासून आज कोणीच सुरक्षित नाहीत, दर मिनिटागणिक देशात कुठल्या ना कुठल्या ठिकाणची स्त्री आज अत्याचाराला बळी पडू लागली आहे. स्त्री अत्याचारावर अंकुश आणण्यासाठी कठोर कायदे करूनही या घटनांमध्ये घट झालेली नाही. स्त्रीने आर्थिक दृष्ट्या सबळ व्हावे यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी शासन राबवत असलेल्या योजना केवळ नावाला शिल्लक असल्याने स्त्री अत्याचाराचा आलेख तिळमात्र कमी होताना दिसत नाही.

ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण दिली त्याच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात स्त्रीची होत असलेली अवहेलना लज्जास्पद आहे. पोलीस प्रशासन असो वा नातेवाईक, सर्वच ठिकाणी स्त्रियांच्या मदतीला धावून येऊ शकत नाहीत. त्यासाठी स्त्रियांनी स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे. प्रतिकूल प्रसंग केव्हा येईल ही वेळ कधी सांगून येत नाही. त्यासाठी आपले मन आणि शरीर सततच प्रतिकारक्षम ठेवण्याची गरज आहे आणि त्याकरिता प्रत्येक स्त्रीने स्वतःचे रक्षण स्वतः करण्याची कला अवगत करून घ्यायला हवी. स्वसंरक्षणाचे किमान प्रशिक्षण प्रत्येकीने आजच्या काळात घ्यायलाच हवे. देवीच्या महाकाली स्वरूपात तिच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे. या शस्त्रांचा वापर करून तिने सजन्नांचे रक्षण आणि दृष्टांचा संहार केला आहे. देवीच्या या रूपाची उपासना आज प्रत्येकी स्त्रीने करायला हवी. राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, राणी चेन्नमा यांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी प्रसंगी शस्त्र हाती घेऊन पराक्रम गाजवला आहे, पराक्रमी स्त्रियांची अशी अनेक उदाहरणे इतिहासात घडून गेली आहेत. या प्रत्येकीने शस्त्रांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते, त्यांच्यामध्ये कमालीचे मनोधर्य आणि दुर्दम्य इच्छाशक्ती होती. या रणरागिणींचा आदर्श समोर ठेवून समाजात माजलेल्या वासनांध शक्तींचा संहार करण्यासाठी आता प्रत्येक स्त्रीने सज्ज हायला हवे. लाठीकाठी, ज्युडो-कराटे आदींचे अद्यावत प्रशिक्षण घेऊन दृष्ट शक्तींवर प्रहार करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. स्त्रीची अबला ही ओळख पुसून ती प्रसंगी सबला होऊन रणरागिणीही होऊ शकते हे समाजाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. विद्येची देवता श्री सरस्वती, धनाची देवता श्री महालक्ष्मी यांसोबत येणाऱ्या नवीन वर्षात शक्तीची देवता श्री महाकाली मातेची उपासना करण्याचा संकल्प करूया. जेणेकरून येणाऱ्या काळात राज्यातील स्त्री अत्याचाराचा आलेख उतरलेला असेल.
-सौ. मोक्षदा घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

स्नेहाची संमेलने वाढोत !