३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
म्हणून शाळा...
प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आणि अभिनेते डॉ.मोहन आगाशे त्यांच्या एका मुलाखतीत मुलाखत घेणाऱ्याला एक प्रश्न विचारतात, ”जेव्हा शाळा नव्हत्या तेव्हा माणसं शहाणी नव्हती का?” त्यांचा हा प्रश्न ऐकताच माझ्या शालेय जीवनाचा पहिलीपासून पदवीपर्यंतचा जीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला. शाळा सोडून पंचवीस वर्षे झाली तरीही प्रश्न ऐकताच शाळेतील अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. जणू काही मी शाळेतच आहे असाच भास मला होत होता. थोडं भानावर आलो. डॉक्टरांचा प्रश्न डोळे मिटून पुन्हा ऐकला आणि माझ्या मनात दुसरा प्रश्न उभा राहिला, शाळा नसती तर मी शहाणा झालो असतो का?
शाळा नव्हत्या तेव्हा माणसं शहाणी होतीच. पण शाळेमुळे त्या शहाणपणाला अजून अर्थ प्राप्त झाला हेही खरंच आहे, हे शाळेत जाऊन जगाच्या कल्याणासाठी बरच काही निर्माण करणाऱ्या माणसांनी सिद्ध केले आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाने भौतिक निर्मितीच्या पातळीवर काही भव्य दिव्य करायलाच हवं असं काही नाही. जगण्याच्या पातळीवरही भव्यतेला आकार देता येऊ शकतो. मानवी जगण्याच्या भव्यतेचे संस्कार शाळा करत असते, हे मी पाहिले आहे, अनुभवले आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात उद्याच्या माणसाला कोणकोणते धोके आहेत या संदर्भात अनेक भाकीतं केली जात आहेत. माणसाला सुखासमाधानाने जगायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर नियंत्रण असायलाच हवं असा विचार जागतिक पातळीवर अनेक तज्ञ मांडत आहेत. ही भीती व्यक्त होण्याचे मूळ कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला भावना आणि संवेदना नसतात. कदाचित भविष्यात त्या येतीलही. पण त्यांनी जर माणसाची जागा घेतली तर? या प्रश्नाचे उत्तर या घडीला फक्त शाळाच देऊ शकते. कारण जगण्याची उंची वाढवण्याचे संस्कार शाळा करत असते. शाळेची ही धडपड आपण जाणून घ्यायला हवी. म्हणजे शाळेचे मोठेपण आपल्याला कळेल, जाणवेल. या जाणिवेसाठी काही क्षण अनुभवू या.
प्रधानमंत्री पोषण सप्ताह अंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये पालकांच्या माध्यमातून पौष्टिक पदार्थांची पाककृती स्पर्धा आयोजित केली होती. सगळ्या शाळांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला सहभाग नोंदवला होता. पालकांची पाककृती आणि मुलांच्या शारीरिक वाढीसाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व याबद्दल पालकांचे ज्ञान कितपत आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक शाळेत जाता आले नाही. पण जिथे गेलो तिथे मात्र सजग पालकत्वचा चांगला अनुभव आला. खेडेगावातील पालक देखील पौष्टिक आहाराबद्दल जागरूक आहेत हे जाणवलं. अशीच एक शाळा. शाळेची पटसंख्या अवघी सतरा होती. पण विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्साह आकाशाला लाजवेल एवढा मोठा होता. पोषण सप्ताहच्या निमित्ताने शाळेत जणू काही उत्सव साजरा होत होता असेच वाटत होते. शाळेच्या एका खोलीत चारही भिंतींना लागून टेबल ठेवले होते. टेबलांवरती सुंदर सजावट करून पौष्टिक पदार्थांची मांडणी केली होती. प्रत्येक टेबलाजवळ एक एक चिमुकले मुल उभे होते. मी प्रत्येक टेबल जवळ जात होतो. टेबलावर मांडलेल्या पदार्थाचे नाव विचारत होतो. मुलं आत्मविश्वासाने नाव सांगत होती. तो पदार्थ कसा केला त्याची कृती त्यांच्या पद्धतीने सांगत होती. पदार्थाची आकर्षक मांडणी पाहून त्याची चव घेण्याचा मोह मला आवरत नव्हता. मला माहीत नसलेल्या, माझ्यासाठी अनोळखी असलेल्या पदार्थांची चव मी घेत होतो. सर्व पदार्थांची पाहणी करून वर्गाच्या बाहेर पडलो. वर्गाच्या बाहेर जात असताना पाठीमागून एक छोटासा मुलगा आला. नुकताच पहिलीत दाखल झालेला तो विद्यार्थी होता. त्याने माझा हात धरला. माझ्या हाताला ओढ लागल्याचे मला जाणवले. काही न बोलताच तो मला पुन्हा आतमध्ये घेऊन जात होता. माझं लक्ष माझ्या हाताकडे गेले. माझ्या हाताला घट्ट धरून तो मुलगा पुन्हा मला वर्गाकडे घेऊन जात होता हे मला जाणवलं. मग मी थोडं जागेवरच थांबलो. मुलगा माझ्याकडे मान वर करून म्हणाला, ”सर, माझा लाडू तुम्ही नाही खाल्ला. मी काही बोलणार एवढ्यात माझे पाय वर्गाकडे वळले. हाताची ओढ वाढली. क्षणार्धात त्याच्या टेबलजवळ आम्ही पोहोचलो. त्याने माझा हात सोडला आणि चिमुकल्या हाताने त्याच्या टेबलावरील लाडू माझ्या हातावर ठेवला आणि, ”खा ना सर असं म्हणाला. लाडूची चव खरंच सुंदर होती. मग मी त्याला विचारले, ”लाडू तू बनवलास? ”नाही ”सर, पण आई लाडू बनवत असताना मी तिथेच बसून होतो. ”सर, माझ्या लाडूचा नंबर येईल ना? तुम्हाला आवडला ना लाडू? त्या मुलाचे बोल लाडूपेक्षा त्या क्षणाला गोड वाटत होते. माणसाने माणसाशी असेच गोड बोलावे आणि माणसं जोडावीत हे शाळेनेच त्याला शिकवले असेल ना?
१५ ऑगस्टची पूर्वतयारी पाहण्यासाठी एका शाळेत गेलो. शाळेचे अंगण आरशासारखे स्वच्छ होते. सर्व विद्यार्थी अगदी काटेकोरपणे रांगेत उभे होते. राष्ट्रगीत आणि ध्वजगीत सुरात गात होते. शाळेची सर्व तयारी पूर्ण झाली होती. तयारी आटोपून मुलं आपापल्या वर्गात रांगेने जाऊ लागली. सरावाच्या वेळी असलेल्या सुरांची जागा आता शांततेने घेतली होती. फक्त पावलांचे आवाज येत होते. कोणी कोणाशी बोलत नव्हते. शिस्तीचे सार्वजनिक रूप पाहून खूप बरे वाटत होते. तेवढ्यात वर्गात जाता जाता एक मुलगी मला म्हणाली, ”ओळखलंत का सर मला. एवढा वेळ आजूबाजूला शांतता असल्यामुळे अचानक कानावर शब्द पडल्याने मी भानावर आलो. रांगेतून चालणाऱ्या मुलीला मी थांबायला सांगितले. तिने तोच प्रश्न पुन्हा विचारला, "ओळखलंत का सर मला? मी स्मरणशक्तीला ताण दिला. पण काही उपयोग झाला नाही. मी तिला ओळखले नाही हे तिला कळले. मग ती हसत हसत म्हणाली, "सर, मी प्रचिती. गेल्यावर्षी तुम्ही आमच्या शाळेत आला होता. माझ्या भाषणाचे तुम्ही कौतुक केलं होतं.” त्याच क्षणाला मला प्रचितीचे भाषण आठवले. तिला मी ओळखलं. तिचं बोलणं सुरूच होतं. "आता पण तुम्ही आमच्या वर्गात या.” आठवीतल्या मुलीचा आत्मविश्वास खूप काही शिकवत होता, सांगत होता. माणसाने माणसाशी कसा संवाद साधायचा याचा धडा ती शिकवत होती. कदाचित भविष्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेला यंत्रमानव असा संवाद करेलही; पण तो आपुलकीने आणि प्रेमाने, "आमच्या वर्गात या,” असं म्हणेल का? हा एक प्रश्नच आहे. माणूस ओळखीचा असो किंवा नसो; माणसाला प्रेमाचे बंधच एकत्र ठेवू शकतात हे संस्कार शाळाच करते ते प्रचितीने शिकवलं.
दुसरीतल्या मुलांनी ‘गर्दी', हा शब्द वाचला. गर्दी या शब्दाचा अर्थ मुलांना खरंच समजला आहे का ही शंका माझ्या मनात आली. म्हणून मी मुलांना विचारले, "मुलांनो गर्दी म्हणजे काय?” मुलं पटापट सांगू लागली, "दुकानात गर्दी असते.” "स्टॅन्डवर गर्दी असते.” "बाजारात गर्दी असते.” मुलांना गर्दीची संकल्पना समजली होती. पण त्याचे व्याख्येत रुपांतर करता येत नव्हते. मग मी पुन्हा प्रश्न विचारला, "आपल्या घरामध्ये गर्दी असते का?” सगळी मुले एका सुरात म्हणाली, "नाही.” थोडा वेळ वर्ग शांत झाला आणि तेवढ्यात एक छोटीशी मुलगी म्हणाली, "घरात पाहुणे आल्यावर गर्दी होते.” मग मी पुन्हा तोच प्रश्न विचारला, "मग गर्दी म्हणजे नेमके काय?” तर ती चिमुकली मुलगी म्हणाली, "जास्त माणसं म्हणजे गर्दी.” मग मी पुढचा प्रश्न विचारला, "गर्दी कोणाकोणाला आवडते?” काही मुलं गर्दी आवडत नाही असं म्हणाली, तर काही गर्दी आवडते असं म्हणाली. घरात पाहुणे आल्यानंतर गर्दी होते असं सांगणाऱ्या मुलीला मी विचारले, "तुला गर्दी आवडते का?” तेव्हा ती मुलगी म्हणाली, "मला गर्दी आवडत नाही, पाहुणे आवडतात.” पाहुणे आल्यावर गर्दी होते असं सांगणारी, गर्दी आवडत नाही असं म्हणणारी, मला पाहुणे आवडतात असं म्हणते. आपली आवड आणि नावड व्यक्त करताना माणसांच्या भावना कशा जपाव्यात हे शहाणपण दुसरीतली मुलगी शाळेतच शिकली असेल.
तसा माणूस आधीपासूनच शहाणा आहे. पण शाळा माणसाचे हे शहाणपण वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. माणसाला सुखाने जगण्यासाठी शहाणपणाची ही उंची हवीच आहे आणि... म्हणून शाळा.... - अमर घाटगे, केंद्रप्रमुख रत्नागिरी