३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
डायरी माझी सखी
डिसेंबर संपत आला की नवीन वर्षाचे वेध लागतात. नवीन वर्ष म्हटलं की आठवते ती डायरी.....दरवर्षी कोणीतरी मला डायरी देतं. त्या डायरीत सटर फटर असं मी काहीतरी लिहायची. वर्ष संपत आलं की थोडीशी पानं भरलेली असायची बाकीची डायरी कोरीच असायची ...त्या कोऱ्या पानांचा काय करायच हे कळायचं नाही. ठेऊन तरी काय करू...असं वाटायचं... नवीन वर्ष... नवीन डायरी ...असं माझं वर्षानुवर्ष चाललं होतं...
काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा... काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती. एके दिवशी मी मासिक वाचत होते. त्यात...आयुष्याच्या संध्याकाळी कुसुमाग्रजांना कायमसाठी साथ करणाऱ्या कवितांसाठी त्यांनी लिहिलेली "सखे”... ही फार सुरेख कविता माझ्या पहिल्यांदाच वाचनात आली. ती मला फारच आवडली. मनात आलं... ही आता वाचली. पण आपल्याला परत वाचावीशी वाटली तर....त्या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात..
"सखे..
तु दिलेल चांदणं
माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे.”
असाच अमाप जीवनभर पुरणारा आनंद कुसुमाग्रजांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला....आपल्याला जे आवडेल ते डायरीत लिहायचं असं ठरवलं.. वाटलं असं साहित्य आपल्याला कुठे मिळणार? नंतर गंमत अशी झाली की डायरीत लिहावं असं सतत कुठे ना कुठे वाचायला मिळालं. मासिकात, पुस्तकात, एवढेच काय अगदी रोजच्या वर्तमानपत्रातसुद्धा...मग ते मी डायरीत लिहायला सुरुवात केली...एकदा वाटलं आपण जे वाचतोय तेच डायरीत लिहितोय..नंतर परत ते वाचण्यात काय गंमत वाटणार? जरा विचार केल्यानंतर लक्षात आले की कित्येक गोष्टी जुन्या होत नाहीत. काही वाचल्यावर लगेच समजत नाहीत. परत शांतपणे वाचल्यावर त्यातला गर्भित अर्थ समजतो.. काही गोष्टी चांगल्या असूनही आठवणीत राहत नाहीत ..त्यामुळे पुनः प्रत्ययात त्याचा आनंद निश्चित मिळेल.
हा नाद लागल्यावर डायरीत काही काही लिहीत गेले... बघता बघता डायरी भरली. माझंच मला खरं वाटेना. हातात घेऊन चाळायला लागले ..डायरीत सलग असं काही लिहिलेलं नव्हतं .कुठेही काहीही होतं. सहज म्हणून सुरुवात केली होती आणि आता डायरीत खूप काही जमा झालं होतं. अनेक कविता डायरीत लिहिल्या आहेत. वाचून वाचून पाठ झाल्या आहेत. एकदा मैत्रिणी घरी आल्या तेव्हा त्यातल्या काही कविता वाचल्या. मैत्रिणींना काही कविता आठवल्या. त्या डायरीत लिहून घेतल्या. तो दिवस कवितांचा झाला अनपेक्षितपणे खूप आनंद देऊन गेला.
बहिणाबाई एका कवितेत म्हणतात
"माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबरा टांगलं
माझं दुःख माझं दुःख
तयघरात कोंडलं”
त्यानंतर खूप दिवसानंतर च्या एका पानावर होत
"माय जॉय इस पब्लिक प्रॉपर्टी
बिटवीन मॅन अँड मॅन
माय पेन इज प्रायव्हेट प्रॉपर्टी
बिटवीन गॉड ॲन्ड मी”
या ओळी कोणाच्या आहेत हे मी लिहिलेलं नाही .कुठून पाहून लिहिल्या हेही मला आठवत नाही.
जगाच्या दोन टोकाला राहणाऱ्या, वेग वेगळी भाषा बोलणाऱ्या लेखकांच्या विचारांमधला आशय किती मिळताजुळता आहे हे वाचून आश्चर्य वाटलं. आपल्या साध्या सुध्या बहिणाबाईं विषयी मनात आदर दाटून आला...एका डायरीत दासबोधातल्या ज्या ओव्या मला आवडल्या आहेत त्या ओव्या मी लिहून ठेवल्या आहेत. कधीतरी शांतपणे बसून वाचताना अवर्णनीय आनंद मिळतो. जीवनाची वाट चालताना सहज काहीतरी त्यातून मला दिलासा मिळतो.
"हु मुव्हड माय चीझ”
ह्या पुस्तकाचं मराठीतील थोडंसं स्वैर भाषांतर मध्यंतरी मी वाचले होते. त्यातली काही वाक्य डायरीतल्या एका पानावर आहेत."बदल घडतात
बदलाचा अंदाज घ्या
बदलावर लक्ष ठेवा
बदलाचा आनंद घ्या
बदलाला तयार व्हा”
हे वाचताना मी विचार करायला लागले. त्या पुस्तकातले अजून काही काही मला आठवायला लागले. मनात आले रोजच्या जीवनात हे किती उपयुक्त आहे.जे कृष्णमूर्ती, वामनराव पै, गोंदवलेकर महाराज, विनोबा भावे, निसर्ग दत्त महाराज यांची व अजूनही बऱ्याच जणांची सुंदर सुंदर वचने डायरीत मी कुठे कुठे लिहिली आहेत. मनाला आधार देणारी, उभारी देणारी अशी कित्येक वाक्यं या डायरीमुळे आज हाताशी आहेत. ही एकदा वाचून उपयोग नाही. ती वारंवार वाचली तरच मनात खोल शिरून तिचा परिणाम होईल, अशी अर्थगर्भ, आशयपूर्ण अशी ती वाक्यं आहेत... अर्थात त्याचा रोजच्या व्यवहारात उपयोग करून घेतला पाहिजे हे पण समजते आहे. डायरीत काही अभंग, गौळणी, गाणी आहेत. पावनेर मायेला करू.. यातल्या शेवटच्या चार ओळी आहेत
"सुखी नांदते संसारी बाई
नाही मागणं आणि काही
काळी पोत ही जन्माची देई
तूच सांभाळ आई लेकरू..”
या ओळी वाचताना डोळे भरून येतात...
मन कातरं हळवं होतं..
एके दिवशी गंमत झाली होती मी त्या दिवशी रागवले होते..रुसले होते... कुणाला काही सांगावं कुणाशी काही बोलावं असं वाटत नव्हतं. नंतर मीच माझ्याशी बोलले होते.. स्वसंवाद साधला होता .स्वतःची समजूत काढून सावरले होते. आज डायरी चाळताना ते मला आठवले... त्या दिवशी डायरीत होतं..
चालायचंच
जाऊ दे
सोडून दे ना
टेक ईट ईझी
आज हे वाचताना मस्त वाटलं...
सांकेतिक पण मला कळणारी अशी बरीच वाक्य डायरीत आहेत.. एका पानावर होतं
"मी शहाणी कधी होईन..
त्या दिवशी मी केलेला वेडेपणा
अहं..नाही हं तो नाही सांगणार...”
त्या दिवशी खरंच माझ्या हातून चूक झाली होती. ती मला कळली होती त्यातून मी धडा घेणार होते. शिकणार होते .
ती चूक परत होऊ नये म्हणून दक्षता घेणार होते.
पुढे लिहिलं होतं
"भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसाऊ या वळणावर...”
या क्षणी डायरी वाचताना मीही क्षणभर थांबले... वर्षभर जसं वागले त्याचा थोडाफार ताळेबंद या डायरीत आहे.डायरीमुळे मी माझ्या मागच्या दिवसांकडे वळून बघू शकते आहे. डायरी वाचताना आठवली ती खूप वर्षापूर्वीची कॉलेजची रंगीबेरंगी डायरी ...त्यात शेर शायरी, हिंदी मराठी गाणी, कादंबरीतले उतारे आणि बरंच काही होतं ...शेवटच्या पानावर तर काय काय होतं... बहरण्याचे ..खुळावण्याचे... फुलण्याचे... ते दिवस होते..ती डायरी वेगळीच होती. लग्नानंतर ती माहेरी राहिली...परत कधीतरी आणली आणि वाढणाऱ्या संसाराच्या पसाऱ्यात कधी आणि कुठे हरवली कळलंच नाही ....
संसारात मीपण पार बुडून गेले. आता आयुष्याला थोडा निवांतपणा आला आहे. म्हणून डायरी लिहायला वेळ मिळत आहे. नंतर पुढच्या डायऱ्या थोड्या प्रौढ प्रगल्भ झाल्या आहेत...माझ्यासारख्या कदाचित...नंतरच्या एका डायरीत असं लिहिलं आहे की.."तुम्हाला असं मनात कितीदा वाटले मी फक्त एवढे बोललो असतो तर....... हो हो सगळे पटते.. पण मनाला पटतही नाही ...”
"असं कसं होऊ शकतं...”
"चलता है...”
ही वाक्य आत्मनिरीक्षण करायला लावणारी आहेत. सहज सोपी शिकवण देणारी आहेत. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे...
डायरीत खूप काही जमा झालं आहे. दोन-चार मैत्रिणींनाही हा नाद लागला आहे.. माझे काय तुझ्याजवळ काय याची चौकशी होत आहे.. एकमेकींना नवीन काही वाचून दाखवलं जात आहे..एक विचारु का? तुम्हाला हा प्रयोग करावासा वाटतोय का ? करून बघा ना ...काय हरकत आहे... कदाचित तुमची डायरी पुढच्या वर्षी तुम्ही मला दाखवाल ... तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं लिहिलं असेल... आपल्या दुसऱ्या मैत्रिणींनी अजून काही लिहिलं असेल.. सगळ्यांचा मिळून एक छानसा खजिना तयार होईल ..
घ्यायचा आहे का नवीन अनुभव ?
करायची का सुरुवात...?
आजकाल आपण हाताने फार कमीच लिहितो...मोबाईलवरपण बोलून टाईप होतं...लिहायला विसरत चाललो आहोत का? पण एक सांगू का ..लिहून बघा. आपण स्वतः लिहिले की शब्द लक्षात राहतात...आणि त्याचे अर्थपण...हे लिहिणं निखळ आनंद देतं.. असं लिखाण आपल आपल्याला समृद्ध करतं ...शहाणं करतं.. ही डायरी आता नुसती डायरी नाही राहिली... ती माझं विसाव्याचं विरंगुळ्याचं ठिकाण झालंय...
तिच्याशी मी कधीही बोलू शकते..
जिला मी मनातलं काही सांगू शकते
अगदी कधीही..
अशी ही कुसुमाग्रजांच्या "सखे” या कवितेनी सुरू झालेली ही डायरी माझी सखी झाली आहे... मैत्रीण झाली आहे...बघा प्रयोग करून...तुम्हालाही तुमच्यातलं काहीतरी नवीन गवसेल....
आयुष्यभर पुरणारं ....साथ देणारं....
- नीता चंद्रकांत कुलकर्णी