३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
महामानवाला घाबरता की.. अजूनही इर्षा आहेच?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला अजूनही कळलेच नाहीत. त्यांना आपण अजूनही अभ्यासले नाही आणि सर्वांपर्यंत पोहचविलेसुद्धा नाही. जे विश्वाला, जे कोलंबियाला कळते ते आम्हाला कळलेच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फॅशन किंवा जोरदार कडक जयभीम ठोकण्याइतपत मय्राादित नाहीत. डॉ. बाबासाहेब म्हणजे एक संस्कृती. रोज जीवन जगण्याची पद्धत.संघर्ष करण्याची जितीजागती ऊर्जा होय.
एका राजकीय पक्षाच्या नेत्याने भर संसदेत वक्तव्य केले आणि संपूर्ण भारतच काय, संपूर्ण विश्वात जोरदार चर्चेला उधाण आले. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता ह्या विषयावर मत व्यक्त करणे म्हणजे फारच धाडसाचे काम आहे असे वाटते.
राजकीय पुढाऱ्यांची जीभ घसरणे हे काय आपल्यासाठी नवीन नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं. कधी कधी राजकीय पुढारी ह्याची जीभ घसरते की हे प्रसिद्धीसाठी मुद्दाम करतात ह्याचासुद्धा अंदाज बांधता येत नाही. एवढे मात्र खरे की राजकीय मंडळी ही जनतेला गृहीतच धरतात आणि मनाला येईल तसे बरगळत असतात.
माणूस केव्हा घाबरत नाही? जेव्हा त्याला काही होणार नाही ह्याची खात्री असते आणि माझे कोणीही काहीही करू शकत नाही ह्याची त्याला शाश्वती असते. माणूस तेव्हाही घाबरतो जेव्हा तो सुसंस्कृत व संस्कारी असतो. जेव्हा त्याला वाटते हे कृत्य सुसंस्कृत व संस्कारी नाही, हे असे करू नये ह्याची त्याचीच त्याला लाज वाटते तेव्हा तो असे करत नाही. आता लाज वाटणे हा प्रकार जवळपास संपल्यातच आहे असे समजा.
ह्या व्हिडिओत ही स्पष्ट जाणीव होते की, ह्याऐवजी तुम्ही असे केले असते तर ती अधिक चांगली बाब झाली असती किंवा अधिक फायदा झाला असता. म्हणजे तुम्ही जे करता, बरोबर करत नाही. ह्या वक्तव्यातून कमी लेखण्याची भावना अधिक स्पष्ट जाणवते.
आता हे वक्तव्य मुद्दाम केले की, चुकून झाले त्याचे तेच जाणो. परंतु जे झाले ते योग्य मात्र निश्चितच नाही व ते समर्थनीय नाही. अर्थात ते निषेधार्ह आहे असे म्हणता येईल.
अरे मानवी स्वभाव आहे. माणसाकडून चुका होतात. मान्य करा ना, चूक झाल्याचे मान्य करायलासुद्धा हिम्मत लागते. आपल्याला लोकशाहीने व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे पण दुसऱ्याच्या भावना न दुखावता. घटनेने आपल्याला आपला धर्मसुद्धा जोपासण्याचा अधिकार दिला आहे.
कोणी एका महापुरुषाचे सन्मानाने नामस्मरण करत असेल तर त्यात आपल्याला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला अजूनही कळलेच नाहीत. त्यांना आपण अजूनही अभ्यासले नाही आणि सर्वांपर्यंत पोहचविले सुद्धा नाही. जे विश्वाला कळले, जे कोलंबियाला कळते ते आम्हाला कळलेच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फॅशन नाही किंवा जोरदार कडक जयभीम ठोकणे एव्हढ्यापुरते ते महामानव मय्राादित नाहीत. डॉ. बाबासाहेब म्हणजे एक संस्कृती. रोज जीवन जगण्याची पद्धत. संघर्ष करण्याची जिती जागती ऊर्जा होय. डॉ. बाबासाहेब म्हणजे सर्वाना सुशिक्षित व गरजुंना मदतीचा हाथ देणारे, देशाचे उद्धारकर्ते. हे आम्हाला माहीतच नाही आणि माहित करून घेण्याची आम्हाला गरज वाटत सुद्धा नाही.
तुम्ही डॉ. बाबासाहेबांना खूप मानता, त्याच्या बद्दल तुम्हाला खूप आदर आहे असे म्हणता, मग माफी का मागत नाही ? का कमी पणा वाटतो ? म्हणे विरोधकांनी विपर्यास केला. अरे बोबले तुम्ही, इतरांना दोष काय देता? जो पर्यंत 'आमचा तो बाबू तुमचं ते कार्ट' ही संस्कृती आहे तो पर्यंत हे असंच चालणार. आपल्या जरी पक्षाचा असला आणि तो चुकला असेल तर त्याला चुकला म्हणण्याची हिम्मत होणार नाही तो पर्यंत हे असेच होत राहणार.
हा व्हिडीओ अधिक बारकाईने पहिला तर लक्षात येईल की ह्या राजकीय नेत्याच्या मागे जो खासदार आहे तोसुद्धा कुत्सितपणे हास्य करतो आहे असे दिसते आहे. म्हणजे काय तर मुद्दाम केल्याचा असे म्हणण्याचा वाव नक्कीच आहे.
आता एकमेकात स्पर्धा निर्माण झाली आहे डॉ. बाबासाहेबांचे खरे समर्थक, तारणहार आम्हीच दुसरे कोणीही या पृथ्वीतलावर नाही. तुम्ही खरंच डॉ. बाबासाहेबांना मानता ना, मग द्या ना राजीनामा. करा ना महामानवासाठी एकदाचे बलिदान. तुम्ही खरे त्यांचे पुरस्कर्ते आहात ना. मग कशाला घाबरता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना? कोणी काही म्हणोत तुमचेच तुम्हाला वाटले पाहिजे की मी चुकलो म्हणून.
अजूनही डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार होतो आहे ह्याला तुम्ही घाबरता? की अजूनही इर्षा आहेच म्हणून बरळता की काय? असे म्हणतात की, मेल्यावर स्वर्ग दिसतो. अरे ह्या महामानवाची एव्हढी किमया आहे की, यांनी आपल्या कर्तृत्वानेच आपल्याला जितेजागतेपणी आपल्या भारतीयांना पृथ्वीवरच स्वर्ग आणून दिला. आपल्याला तो स्वर्गाचा आनंद, तो दर्जा प्राप्त झाला तो स्वर्गच तर आहे ना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतीयांचे पॅशन आहेत हे काही कोणाला सांगायला नको.
डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार उगाच होत नाही. डॉ. बाबासाहेबांचे कार्य आहे, त्यांची राष्ट्रभक्ती आहे, ते राष्ट्रासाठी झटले आहेत. स्त्रिया आणि कामगारांसाठी त्यांनी त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. त्यांनी मानवता भारतातच नाही तर विश्वात सुद्धा रुजविली आहे.
ते खरच ठरते आहे की dead Dr. Ambedkar is more dangerous than alive ह्याची सर्वाना आता परिचिती येत आहे. जेव्हढा डॉ. बाबासाहेबांना विरोध कराल ते तेवढ्या जोमाने परत उभारून येत राहतील. कारण की आपल्या जीवनाचे सार, आयुष्याचे सार्थक म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत. - अरविंद मोरे