ऑर्केस्ट्रा संकल्पना लोप पावतेय.

अलिकडच्या काळात सोशल मिडीया म्हणजेच समाज माध्यम नामक गारुडाने अनेकांना (स्व)मग्न केले असून त्याच्या अनेक अप्रिय परिणामांची जाणीव होत त्याबाबच्या चर्चाही कानोकानी पोचत आहेत. सोशल मिडीयासाठी किती वेळ द्यावा, इथपासून ते त्याच्या धोवयांबाबतही आता कुटुंब आणि मित्रपरिवारात चिंता व्यवत होऊ लागली आहे. मात्र अशा गोष्टींचा एकेकाळी अत्यंत रसिकप्रिय आणि लोकप्रिय झालेल्या कला क्षेत्रातील वाद्यवृंद म्हणजेच ऑर्केस्ट्रालाही टिव्हीसह सोशल मिडीयामुळेही फरक पडला आहे, पडत आहे. ही संकल्पना आता लोप पावत चालली आहे, अशी खंत ‘सुरेल गीतांचा अनोखा नजराणा'...असे बिरुद लावलेल्या ‘सुनहरी यादें' या व ‘तुझे गीत गाण्यासाठी' या वाद्यवृंदांच्या संचालिका व गायिका प्रमिलाताई दातार यांनी दैनिक ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी घेतलेल्या मुलाखतीतून व्यवत केली.

शालेय जीवनात संगीताचे धडे गिरवलेत, तुम्हाला अभिनयाचेही अंग होते. मग या कलेत मोठ्या झालात, यात आईकडून वारसा होता का?
आईचा आवाज छान होता. पण तिच्याकडून वारसा नाही.
कला क्षेत्रात येताना शालेय नाटकांतून पुरुष भूमिका केल्या होतात. त्याबद्दल काय सांगाल?
 होय. सुरुवातीला अशा भूमिका करण्याची संधी मिळाली. माझी उंची आणि माझा आवाज यामुळे या भूमिका करता आल्या. ‘संगीत सौभद्र'मध्ये श्रीकष्णाची आणि ‘संगीत शारदा'मध्ये कोदंडाची भूमिका या नाटकांमध्ये केली. अर्थात सर्व मुलींनीच या नाटकांमध्ये कामे केली होती. फार चांगला अनुभव होता तो.
तुम्ही अभिनय चांगल्या प्रकारे करु शकत असताना गायनाकडे कशा वळल्यात?
अभिनय चांगल्या प्रकारे करु शकले असतेही. अगदी प्रभाकर पणशीकर, राजाराम शिंदे या सारख्या दिग्गजांनी नाटकात काम करणार का? अशी विचारणाही केली होती. मात्र गायनाकडे कल होता. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये हिंदी-मराठी गाणी गाण्यांचे कार्यक्रम केले. त्यास सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला.

... आणि मग १९७५ साली ‘सुनहरी यादें' सारखा वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा ) सुरु करीत पुढे त्याचे देश विदेशात ४००० प्रयोग होणे हे सारे कसे जमले? वाद्यवृंद सुरु करण्याबाबतची संकल्पना कशी सूचली?

नाटकांमध्ये काम करण्यासंबंधी मान्यवरांकडून विचारणा होत असताना पति म्हणाले, की मग तुझ्या गायन कलेचे-त्या कार्यक्रमाचे कसे होणार? नाट्यक्षेत्रात जाण्यापेक्षा गायन कलेला महत्व देत यातून नवे काही निर्माण कर. त्यात पुढे जा. असा सल्ला दिला. मग मीही याबाबत विचार केला आणि वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा ) सुरु केला. त्याचे अनेक ठिकाणी प्रयोग झाले. मोठे यश ‘सुनहरी यादें' व ‘तुझे गीत गाण्यासाठी' या वाद्यवृंदांना मिळाले. त्याचबरोबर मला तलत मेहमूद, महमद रफी, किशोर कुमार, मन्नाडे या दिग्गज गायकांच्या सोबत विविध दौऱ्यांवर जाण्याची संधी मिळाली होती.  सारेच कलाकार मोठे असतानाही सारेच जण एकमेकांचा आदर करीत असत. सारेच जण एकमेकांना सांभाळून घेत असत. त्यांच्यात मी खूपच ज्युनियर असूनही मला सांभाळून घेतले, हे विशेष. त्यामुळे  सर्वच वाद्यवृंद कार्यक्रमांचे अनुभव छानच होते.

वाद्यवृंदाच्या गायन प्रवासात काही वेगळे, मनाला चटका लावणारे काही अनुभव...
होय. बरेच असे अनुभव आहेत. नागपूरजवळील एका कार्यक्रमात कव्वाली गायन आवडल्यावर एक वृध्द चाहता दोन रुपयांची चुरगळलेली नोट भेटीदाखल देऊन गेला, ही आठवण लक्षात राहिली आहे. अनेक साखर कारखान्यांतील गणेशोत्सवात कार्यक्रम केल्यावर उपस्थित महिलांकडून खूप माया व प्रेम मिळाले.
गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता आताच्या काळात वाद्यवृंद म्हणजेच ऑर्केस्ट्राला उतरती कला लागली आहे असे वाटत नाही?

वाद्यवृंदांच्या रसिकाश्रयाला आजकाल नव्हे, तर २००० सालापासून ओहोटी लागली आहे. पूर्वी टिव्ही आणि अलिकडच्या काळात  सोशल मिडीया म्हणजेच समाज माध्यम अशा गोष्टींचा परिणाम होत आहे. एकेकाळी अत्यंत रसिकप्रिय आणि लोकप्रिय झालेल्या कला क्षेत्रातील वाद्यवृंद म्हणजेच ऑर्केस्ट्रालाही टिव्हीसह सोशल मिडीयामुळेही फरक पडला आहे, पडत आहे;  ही संकल्पना आता लोप पावत चालली आहे, याची खंत वाटते. टीव्ही, मालिका यांच्यामुळे लोकांना घरबसल्या मनोरंजनाची साधने उपलब्ध झाली आहेत. वाद्यवृंदांचे रसिक-श्रोते कमी झाले. नाटकांनाही याचा फटका बसला. पूर्वी रंगभूमीवर दिवसाला एखाद्या नाटकाचे २-३ प्रयोग व्हायचे, आता नाटक चांगले असेल तर एक प्रयोग होत असतो. आताच्या काळात याला सोशल मिडीया म्हणजे समाजमाध्यमेही कारणीभूत आहेत.  

गायनकला क्षेत्रात विसेषतः वाद्यवृंदाकडे वळत या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या नवगायक-गायिका अशा कलाकारांना काय सल्ला द्याल?

 गायनकला क्षेत्रात  वाद्यवृंदाकडे वळत या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या नवगायक-गायिका अशा कलाकारांना काळ कठीण आहे, जे ध्येय असेल ते पूर्ण होईलच असे नाही; या वास्तवाचे भान बाळगणे आवश्यक आहे. या क्षेत्राकडे वळलो तरी चरितार्थ चालू शकेल की नाही,  हे मला माहित नाही. वाद्यवृंद सुरु करणे आणि त्यासाठीची यंत्रणा (साधन सामुग्री) असणे, मनुष्यबळ जमवणे आणि त्यांचे वेतन-मानधन, प्रवास अशा बाबी सांभाळणे सहज साध्य होणे अवघड आहे. आता याही स्थितीत अशोक हांडे यांचे वाद्यवृंद सुरु आहेत हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. मात्र नवख्यांनी याकडे वळणे यशस्वितेची खात्री नसल्यासारखी स्थिती आता असल्याचे स्पष्ट दिसते.  -शब्दांकन : रामनाथ चौलकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 ईश्वरावीण कामना पाहे। कालत्रयी दुःखचि आहे