ईश्वरावीण कामना पाहे। कालत्रयी दुःखचि आहे

अतिमुर्खाला दुहेरी दुःख भोगावे लागते. विषयांच्या अतिलालसेमुळे तृप्ती मिळत नाही, मनःशांती लाभतनाही. सुखासाठी बाह्य वस्तु, व्यक्ती, परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे परावलंबनातून येणारी लाचारी,दैन्य जीवनभर व्यापून राहते. त्याचे दुःख होते.आणि भक्तीचा अभाव असल्याने खरे, शाश्वत सुख प्राप्त होत नाही.

नको दैन्यवाणे जिणे भक्तीऊणे।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे।
धरी रे मना आदरे प्रीती रामी।
नको वासना हेमधामी विरामी । श्रीराम६५।

मागच्या श्लोकात (६४) समर्थांनी सांगितले कीअति मूढ लोक सदा विषयांचे स्मरण करतात. त्यामुळे त्यांच्याकडून भगवंताचे स्मरण होत नाही. परिणामी त्यांचेजीवन दैन्यवाणे होते. ह्या श्लोकांत समर्थ म्हणतात, असे भक्तीहीन दैन्यवाणे जीवन असू नये. अतिमूर्खाला दुहेरी दुःख भोगावे लागते. विषयांच्या अति लालसेमुळे तृप्ती मिळत नाही, मनःशांती मिळतनाही. सुखासाठी बाह्य वस्तु, व्यक्ती, परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे परावलंबनातून येणारी लाचारी, दैन्यजीवनभर व्यापून राहते. त्याचे दुःख होते.आणि भक्तीचा अभाव असल्यामुळे खरे, शाश्वत सुख प्राप्त होतनाही. वासनेमुळे जीवाला पुन्हा जन्म-मरणाचे बंधन लागू होते. दुःखाचा हा गुणाकार जीवनातून भक्ती वजाझाल्याने होतो. सर्वश्रेष्ठ परमात्मा सगळ्या सृष्टीचा कर्ता, धर्ता आहे. त्याच्या संकल्पाने सृष्टी निर्माणहोते, त्याच्या कृपेने तिचे पालन होते आणि त्याच्या योजनेप्रमाणे तिचा लय होतो. भगवंत सर्वसत्ताधीश आहेचतसाच अत्यंत कृपाळूही आहे. जीव आपल्या प्रारब्धाने सुख-दुःख भोगत असतो. आपल्याच कर्माने ओढवून घेतलेले दुःख असह्य होऊन जेव्हा तो भगवंताला कळवळून साद घालतो तेव्हा कृपावंत भगवंत त्याची उपेक्षान करता कोणत्या तरी रूपात धावून येतो.

 अनंत काळापासून अनंत भक्तांचा हा अनुभव आहे. म्हणून समर्थ म्हणतात की त्या कृपावंत भगवंताला आपलासा करून घे. माणसाने कितीही धनदौलत कमवून ठेवली, कितीही नातीगोती जोडून ठेवली आणि कितीही आधुनिक, आरामदायक वस्तुंचा संग्रह केला तरी शरीराला, मनाला सुख देण्याची त्यांची क्षमता अत्यंत मय्राादित आहे. माणूस अगदी सोन्याच्या महालात जरी राहत असेल, सर्व सुखसोई त्याला उपलब्ध असतील, नोकर-चाकर हात जोडून अविरत सेवेसाठी उभे असतील तरीही जर त्या घरात ‘राम' नसेल, मनात ‘राम' नसेल तर त्याच्या तथाकथित वैभवशाली जगण्यातही ‘राम'नसतो. म्हणजे अशा जगण्यात काही अर्थ नसतो. हे रामाशिवाय असलेले भक्तीउणे जिणे शेवटी दैन्यवाणेच ठरते. ‘विरामी' शब्दाचा एक अर्थ ह्याप्रमाणे ‘रामाविना' असा आहे.तर दुसरा अर्थ आहे केवळ विराम म्हणजे आराम असणारे, कष्ट नसणारे, सुखासीन जीवन.
समर्थ म्हणतात, अमाप संपत्ती, आरामाचे जीवन यावर वासना ठेवू नकोस. समर्थांचा अथक प्रयत्न, अत्यंत कार्यप्रवणता यावर भर आहे.ते स्वतः त्याप्रमाणे जगले आहेत. त्यांना कष्टाशिवाय असलेले सुखलोलूप जीवन मान्य नाही. त्यांचे म्हणणे आहे की माणसाने भगवंताचे अधिष्ठान मानून खूप प्रयत्न, अचूक प्रयत्न करावेत, खूप वैभव मिळवावे, समाधानाने जगावे, त्याचबरोबर काही परोपकार, दानधर्मही करावा. दासबोधात समर्थ म्हणतात, ”सुखा आंग देऊ नये। प्रेत्नपुरूषे सांडू नये। कष्ट करिता त्रासो नये। निरंतर”  श्रीराम (२-२-१४) स्वामी वरदानंद भारती म्हणतात, ”ईश्वरभक्तीचे महत्त्व आपल्याला पटत नाही याचे कारण आपल्या अंतःकरणातील भौतिक सत्ता-संपत्तीची मूर्खअभिलाषा. संपत्तीच्या मागोमाग अहंकार, ईर्षा, संघर्ष उत्पन्न होतात. शरीराला, मनाला सहनशीलता राहतनाही. ऐश्वर्यात लोळत असतानाही मन दुःखाने, वैतागाने भरून राहते. शरीर राबवले नाही तर कार्यक्षम राहतनाही. शरीराची कार्यक्षमता उणावली म्हणजे ऐश्वर्याचे सुख भोगण्याचे त्राणही त्या शरीरात राहत नाहीत.” नको ते शारीरिक, मानसिक रोग मागे लागतात. ही दैन्यावस्था ‘विरामी  वासना ठेवल्याने होते.म्हणून आवश्यक तेवढी विश्रांती जरूर घ्यावी.. पण मऊमऊ आसनावर लोळत पडण्यात सुख आहे असे मानण्याचा मूर्खपणा करू नये.

भवदुःखातून सुटण्यासाठी, दैन्य संपवण्यासाठी शहाणपणाचा आणि सोपा मार्ग समर्थ सांगत आहेत तो म्हणजे भगवंतावर प्रेम करण्याचा. सहवासाने प्रेम वाढते, चिंतनाने सहवास वाढतो, नित्य नामस्मरणाने चिंतन वाढते. भगवंताच्या सोज्वळ, प्रेमळ रूपाचे स्मरण केल्याने प्रेम वाढते. त्याच्या परमश्रेष्ठ गुणांचे स्मरण केल्याने आदर वाढतो.प्रेम आणि आदर यांच्या संयोगातून भक्ती उदय पावते. अनन्य भक्तीने भगवंताखेरीज इतर सर्व आश्रय समाप्त होतात. त्याचबरोबर विषयवासना संपतात आणि वासना संपल्या की दैन्यही संपून जाते. मन भगवंताच्या स्मरणात गुंतून राहते तेव्हा मनाच्या रिकामपणातून येणारे दैन्य देखील नाहीसे होते. रिकामे मन- अर्थात्‌ ध्येयरहित मन हे सैतानाचे घर म्हटले जाते. तमोगुणाचे जणू ते आगर असते. जिथे तमोगुणाचे वास्तव्य असते तिथे सुख-शांती-समाधान नांदत नाहीत.तेवढ्याच साठी समर्थ सांगत आहेत की ‘विराम' स्थिती नको. म्हणून ईश्वराच्या कमनेने संसाराच्या कामनांचानाश करावा, आनंदस्वरूप भगवंताला आपलेसे करून भवदुःख दूर करावे. मूर्खपणाचा, आळसाचा त्याग करूनशहाणे व्हावे, साक्षेपी व्हावे आणि मनुष्यजन्माचे सार्थक करुन धन्य व्हावे.
जय जय रघुवीर समर्थ
- सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भावनाप्रधान, मातृभक्तसाने गुरुजी