३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
मी शिल्पा... स्वयंप्रेरीत स्त्रीचे आत्मकथन !
नवोदित लेखिका सुश्री शिल्पा तमलपल्लेवार गंपावार लिखित अन् देवेंद्र भुजबळ संपादित 'मी, शिल्पा चंद्रपूर ते केमॅन आयलॅड' हे पुस्तक नुकतेच सौ.अलका देवेंद्र भुजबळ यांच्या ‘न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन, नवी मुंबई' यांनी प्रकाशित केले आहे.वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षित असलेल्या लेखिका त्यांचा एकूण स्वभाव व वृत्ती प्रवृत्ती ही सकारात्मक विचारांची आहे. टीप कागदाप्रमाणे त्या आजुबाजुला घडणाऱ्या घटना, प्रसंग आपल्या मनाच्या वहीत लिहून ठेवतात.
जागतिक साहित्याच्या इतिहासात ‘आत्मकथा' या साहित्य प्रकाराला जसे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तसेच अन्य भारतीय भाषेतील विशेषतः मराठी भाषेतही अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. त्यात उल्लेखनीय अशी जी आत्मकथने आहेत त्यात आचार्य अत्रे यांचे ‘क-हेचे पाणी', स्वा.वीर सावरकर यांचे ‘माझी जन्मठेप', महात्मा गांधी यांचे ‘सत्याचे प्रयोग', गो. नी. दांडेकर यांचे ‘स्मरणगाथा' या शिवाय श्री. म. माटे, न. वि. गाडगीळ, वि. द. घाटे या दिग्गज साहित्यिकांच्या आत्मकथा या खरोखरच प्रेरणादायी आहेत. या आत्मकथा प्रकारात ‘स्त्री' साहित्यिकांचा सुध्दा खूप मोठे योगदान आहे.
स्त्री साहित्यिका मध्ये सिंधूताई सपकाळ, लेखिका गिरीजा कीर, उषा मेहता, गोदाताई परूळेकर यांचे, जेव्हा माणूस जागा होतो, लक्ष्मीबाई टिळक, सौ.सुहास नाईक व सदानंद नाईक (हे राज्य शासनात भाषा संचालनात साहित्यिका सौ.सरोजिनी शंकर वैद्य या प्रमुख असताना त्यांचे सहयोगी होते. ते भाषा तज्ज्ञ होते. तसेच अमराठी राज्यपालांचे मराठी भाषेचे शिक्षक होते) या उभयतांनी अनुक्रमे आपले वडील व सासरे यांचे चरित्र संपादित केलेले, माझे आत्मचरित्र उदबोधक आहे. अशा आत्मकथनात्मक लेखिकेत नवोदित लेखिका सुश्री शिल्पा तमलपल्लेवार गंपावार लिखित अन् देवेंद्र भुजबळ संपादित ‘मी, शिल्पा चंद्रपूर ते केमॅन आयलॅड' हे पुस्तक नुकतेच सौ.अलका देवेंद्र भुजबळ यांच्या ‘न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन, नवी मुंबई' यांनी प्रकाशित केले आहे.
मुळातच लेखिका या स्वयंप्रेरित कलाकार आहेत. त्या चित्रकला आणि काव्य करणे यात रमतात. त्या मूळच्या चंद्रपूर या महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या शहरातील आहेत. वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षित असलेल्या लेखिका त्यांचा एकूण स्वभाव व वृत्ती प्रवृत्ती ही सकारात्मक विचारांची आहे. टीप कागदाप्रमाणे त्या आजुबाजुला घडणाऱ्या घटना, प्रसंग आपल्या मनाच्या वहीत लिहून ठेवतात. उच्च ध्येयांनी त्या प्रेरीत न झाल्यास नवल म्हणावं लागेल. शिल्पकाराला जसे Every block of stone has a statue in side it. It is the task of sculpture to discover it.
या उक्तीप्रमाणे लेखिकेने स्वतःचे आत्मकथन ‘मी, शिल्पा चंद्रपूर ते केमॅन आयलॅड' लिहिले आहे. या आत्मकथेला साहित्यिक, महाराष्ट्र शासनाच्या माहिती संचालनालययाचे निवृत्त संचालक, मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माता देवेंद्रजी भुजबळ यांनी लिहिलेल्या साक्षेपी प्रस्तावनेत ते म्हणतात, आतापर्यंत मराठी साहित्यात प्रसिद्ध झालेल्या आत्मकथेत हे आत्मकथन ‘मैलाचा दगड' ठरेल असा सकारात्मक विश्वास व्यक्त केला आहे. लेखिकेने या आत्मचरित्रात ‘कोविडचा काळ, स्वतःचा मित्र परिवार', विशेषतः तिच्या खास मैत्रिणी यावर यथायोग्य वर्णन केले आहे.
आज आपण पाहतो, ऐकतो, अनुभवतो ते म्हणजे शंभर पुरुष एकत्र नांदतील, पण दोन स्त्रिया एकत्र नांदणे कठीणच ! थोडक्यात ‘स्त्रीची वैरीण स्त्रीचं असते, नव्हे..आहे याचा प्रत्यय प्रत्येकाला येत असताे' मग अशा प्रतिकूल परिस्थितीत लेखिकेने असा विश्वास व्यक्त केला आहे की, ”स्त्रीच व्हावं स्त्रीची ‘हितचिंतक'.. आणि हे शक्य आहे..पण.. असो, लेखिका म्हणते, माझे जीवन : भातुकलीचा खेळ यांचा प्रत्यय म्हणजे हे आत्मकथनात्मक चरित्र होय. यात एकूण सव्वीस प्रकरणातून लेखिकेने ‘केमॅन आयलॅड' मध्ये आगमन होण्यापूर्वी बालपण, प्राथमिक, माध्यमिक, विश्वविद्यालयीन शिक्षण, नागपुरमधील वास्तव्य, कौटुंबिकादीचा यथार्थ मागोवा घेतघेत स्वतःच्या समग्र जीवनावर यथार्थ प्रकाशझोत टाकला आहे. लेखिकेने आपल्या आजी, आई, यांचे आशीर्वादात्मक मार्गदर्शन यांचा कृतज्ञतेने उल्लेख केला आहे.
‘सुख पाहता जवा एवढे, दु;ख पर्वता' एवढे यांचा स्वानुभव वाचताना सृजन वाचकांना यांची प्रचिती पदोपदी अनुभवाला येत असते, नव्हे आहे. असे विविधांगी जीवन स्पर्श करणारे हे सृजन वाचक विशेषतः स्त्रीयांनी अवश्य वाचावे असे हे ‘मी शिल्पा..' चरित्र आहे.
एकूृण पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ, मांडणी रचनासह उत्त्कृष्ट आहे. हे पुस्तक प्रकाशित करणा-या न्यूज स्टोरी टुडेच्या प्रकाशिका सौ. अलका देवेंद्र भुजबळ यांचे हार्दिक अभिनंदन. - नंदकुमार रोपळेकर
संपादन : देवेंद्र भुजबळ