३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
भावनांचे बांध फुटू द्या..
आज आय.क्यू कडे सगळ्यांचं लक्ष आहे; पण भावनिक आय.क्यू.वाढण्यासाठी पाहिजे तितकं कोणाचंच लक्ष नाही. आम्हाला कुटुंबापासूनच सुरुवात करावी लागेल. प्रत्येकाला जिल्ह्याचे कलेक्टर व्हायचं आहे; पण घरातलं कलेक्टरपण नको. अनावश्यक बाबींचे काँग्रेस गवत काढल्याशिवाय वनस्पतीची सुदृढ वाढ होत नाही तसंच समाजाचं आहे आणि ते आपल्यालाच करायचं आहे.
वसईमध्ये एका मुलीला हत्याराने तिच्या प्रियकराने मरेपर्यंत मारले. ४०-५०लोक नुसतं बघत होते. थांबून थांबून मुलगी मेली नाही असे पाहून पुन्हा पुन्हा मारत होता. एका झटक्यात त्याने जीव घेतला नाही. थांबून थांबून हे सर्व चाळीस-पन्नास लोक पहात होते, एक जरी पुढे आला असता व त्याला रोखले असते तर मुलीचा जीव वाचला असता. प्रियकराने १६-१७ वार त्याच्या प्रेयसीवर केले आणि प्रत्येक वार झाल्यानंतर तो बघत असे ती मेली का नाही. आजूबाजूचे लोक जवळ येऊन पाहत होते, जिवंत आहे का मेली, पण कुणाचंही धाडस झालं नाही. चार जण जर धावत गेले असते तर त्याला अटकाव होऊ शकला असता, पण मन जेव्हा दगड होतं तेव्हा पाझर फुटत नाही. मागे दिल्लीला एका तरुणीला भोसकून भोसकून मारले..पण कोणीही तिला वाचवले नाही. अशा अनेक घटना आहेत, हे सर्व पाहिल्यानंतर शिक्षणापेक्षाही मूल्यांची रुजवणूक आवश्यक बनली आहे हेच जाणवतं. आई शिकलीतर कुटुंब शिकतं; पण आता एक कुटुंब शिकलं तर समाज शिकेल.
भावनांना जगवायचं असेल तर आम्हाला अंतर्बाह्य बदलावं लागेल. नात्यामध्ये सुद्धा आज कुणाला कुणाबद्दल काही वाटत नाही. तोंड उघडण्याची संधीच व्यक्तिमत्व फुलवणार आहे. मुलांच्या स्क्रीन टाईम बद्दल बोलणे वाढत असताना मोठेसुद्धा त्यात रुतले आहेत. आपल्या स्वातंत्र्यासाठी मुलांना कुठेतरी गुंतवणं हे पालकांची आज निकड बनली आहे, त्यांना एक तर शाळेत किंवा हातात मोबाईल दिला की त्रास देत नाहीत त्यामुळेच स्क्रीन टाईम वाढत आहे.
आज आय.क्यू कडे सगळ्यांचं लक्ष आहे; पण भावनिक आय.क्यू.वाढण्यासाठी पाहिजे तितकं कोणाचंच याच्याकडे लक्ष नाही. आम्हाला कुटुंबापासूनच सुरुवात करावी लागेल. प्रत्येकाला जिल्ह्याचे कलेक्टर व्हायचं आहे; पण घरातलं कलेक्टरपण नको.
प्रत्येक पालकाला वाटतं आमची मुले इतके रूक्ष कशी? मोठी माणसे घरी आल्यावर, आम्ही मोठ्यांच्या पाया पडायचो, ते आले की त्यांच्याशी बोलायचो, पण आजची मुलं मुली रुममधून बाहेरसुद्धा येत नाहीत आणि पाया पडण्याचं दूरच. संस्कारात एक पिढी मागे पडली की असंच होतं. आजचे पालक म्हणतात आम्हाला आमच्या आई-वडिलांचा आजोबांचे धाक होता, तशी आजची मुलं का म्हणत नाहीत? मुलांना स्वार्थीपणाचे प्रशिक्षण कुटुंबातच मिळत आहे. एकाच आई-वडिलांचं रक्त असणारे मुले एकमेकांचे वैरी होत आहेत. आई कामावर जाते, घरात कोणी नाही अशा परिस्थितीत एकलकोंडया परिस्थितीतून मुलें वाढत आहेत. काही मुलं बलात्कार, चोरी करत आहेत किंवा एकमेकांच्या जीव तरी घेत आहेत. Hit and Run ला ३०० शब्दांचा निबंध ही शिक्षा असेल तर समाज कसा सुधारेल?
प्रेमाचा अर्थ ठाऊक नसणारी पिढी एकमेकांचा जीव कसा घेऊ शकते? म्हणजे प्रेमाचा अर्थ त्यांना समजलाच नाही. शरीरावरच प्रेम केलं जात आहे मनाचा थांगपत्ता नसलेली मुलं एकमेकांना संपवत आहेत. नको त्या वयात प्रेम, नको त्या वयात दारू, नको वाहन चालवणे, नको त्या वयात वासना, मुलांची काही चूक नाही. कारण हे सर्व त्यांच्यासमोर हात जोडून उभे आहेत. आम्हीच ते उपलब्ध करून दिले आहे. ॲनिमलसारखे चित्रपट मुलांचा अभ्यासक्रम बनले आहेत, त्यात हिंसा आहे, वासना आहे, कामूक दृश्य आहेत. दारूचा महापुर आहे. लग्नासारखे मोठे निर्णय मुलं आई-वडिलांना विचारून आजकाल कुठे घेतात? आई वडील जुने फर्निचर झाले आहेत. शिक्षणातला अभ्यास जीवन जगताना कुठेच मदतरूप होत नाही. अभ्यास झेपत नाही म्हणून मुले आत्महत्येला जवळ करत आहेत. कोणीच त्यांना समजावणारं, मायेनं गोंजारणारं नसावं हे दुर्दैव आहे. सगळ्याच पालकांना वाटतं की आपली मुलं डॉक्टर इंजिनियर व्हावीत; पण पुढे ते परदेशात जाऊन जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सने आपला मृत्यूचा सोहळा पाहतील तेंव्हा याचसाठी केला होता का अट्टाहास असे त्यांना वाटेल.
मोठ्या प्रशस्त बंगल्यामध्ये आज केवळ आजी-आजोबा एकटे राहत आहेत त्यांना मदतनीस लागतो. भयाण जीवन ते जगत आहेत. पालक आपले खबर स्वतः खोदत आहेत. संस्कार जाऊन सेंसॉर आला आहे. संस्कार विकाराला थारा देत नव्हतं, आता सेंसार कामसूपणाला खतपाणी घालत आहे. कथेची मागणी म्हणून अनेक उत्तान दृश्य, अलिंगन यांना परवानगी मिळत आहे; पण त्याचा परिणाम नव्या पिढीवर काय होतो याचाही विचार करणं आवश्यक आहे. नुसतं वैधानिक इशारा देऊन काही होणार नाही. मरणारे मरतच आहेत त्यांचं आयुष्य उध्वस्त होतच आहे.
फसव्या जाहिराती चालू आहेत. तंबाखू सेवनामुळे कॅन्सर होतो असा भयानक व्हिडिओ चित्रपटगृहात दाखवूनही लोक तंबाखू सिगारेट सोडत नाहीत म्हणजेच ते अंतर्बाह्य बदललेले नाहीत. कारण त्यांच्या अवतीभवतीचा वातावरण कुटुंबातला वातावरण त्यांना मदतच करत होतं. टीव्ही काय फक्त बलात्कार, हिंसा, खून, दरोडे, कारने चिरडून मारणे यासाठीच पाहयचा कां?
कोयत्याने मारणे, कारने चिरडणे असे नवीन नवीन पॅटर्न उदयास येत आहेत. भवताल बिघडले की व्यक्तिमत्त्वाचा ताल बिघडतो.
अनावश्यक बाबींचे काँग्रेस गवत काढल्याशिवाय वनस्पतीची सुदृढ वाढ होत नाही तसंच समाजाचं आहे आणि ते आपल्यालाच करायचं आहे. -डॉ.अनिल कुलकर्णी