जीवनातल्या चुकाः शिकवण आणि पुढे जाण्याचा प्रवास
जीवनाच्या वाटचालीत प्रत्येकजण चुका करतो. काही चुका छोट्या असतात, तर काही मोठ्या. काहींचा परिणाम तात्पुरता असतो, तर काही चुका आयुष्यभर स्मरणात राहतात. पण या चुकांचं महत्त्व फक्त त्यांच्या परिणामांमध्ये नाही; त्यातून मिळणाऱ्या शिकवणीत आहे.
चुका म्हणजे अपयश नव्हे, शिकण्याची संधी आहेः चुका म्हणजे अपयशाची निशाणी नव्हे, तर त्या आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या आहेत. आपण कधी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा चुका अपरिहार्य असतात. त्यातून आपण काय शिकतो, हेच महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ..पहिल्यांदा सायकल चालवताना आपण पडतो..नाही का? पण त्या पडण्यानंतर आपण पुन्हा उभं राहतो, संतुलन साधतो आणि पुढे चालतो. जीवनातल्या प्रत्येक चुकांनाही असंच बघायला हवं. चुका स्वीकारणं ही पहिली पायरी. आपल्या चुकांना स्वीकारणं सोपं नसतं. अनेकदा आपल्या अहंकारामुळे किंवा लोकांच्या प्रतिक्रियांमुळे आपण चुका झाकण्याचा प्रयत्न करतो. पण चुका मान्य केल्याशिवाय त्यातून शिकणं शक्य नाही. ”हो, मी चुकीचं केलं,” हे मान्य करणं म्हणजे पुढच्या टप्प्याचं दार उघडणं आहे.
शिकण्याची प्रक्रियाःचुका झाल्या, तर विचार करा.. का झाल्या? कुठे कमी पडलो? आपल्याकडे असलेली माहिती किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया योग्य होती का? या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण भविष्यात अशा चुकांना टाळण्याची तयारी करू शकतो.
पुढे जाणं महत्त्वाचं आहे. चुका झाल्या म्हणून स्वतःला दोष देऊन थांबणं चुकीचं आहे. चुका म्हणजे अंत नव्हे; त्या पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात. आपल्याकडून झालेल्या चुका स्वीकारून, त्यातून मिळालेली शिकवण अंगीकारून आपण नव्या जोमाने काम करू शकतो. प्रेरणा घेत पुढे जाणं आवश्यक आहे. इतिहासातील अनेक थोर व्यक्तींच्या आयुष्याचा विचार केला, तर तेव्हा लक्षात येईल की त्यांचं यश त्यांच्या चुकांमुळेच घडलेलं आहे. त्यांनी त्यांच्या चुकांकडे शिकवणी म्हणून पाहिलं. थॉमस एडिसननं बल्ब बनवताना केलेले हजारो प्रयोग ”अपयशी” नव्हते, तर त्या शिकण्याच्या पायऱ्या होत्या.
शेवटी असं आहे पाहा... जीवनात चुका होणारच. त्या टाळता येणार नाहीत. पण आपण त्या चुकांमधून शिकू शकतो, त्यांचं ओझं न बाळगता पुढे जाऊ शकतो. म्हणूनच,चुका केल्या असतील तर त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. त्या तुमच्या आयुष्याचा भाग आहेत आणि त्या तुम्हाला अधिक सक्षम बनवतात. आयुष्याचा मूलमंत्रः ”चुका झाल्या, हरकत नाही; पण त्या चुकांमधून शिकून पुढे जाणं कधीही थांबू नका.”
-प्रशांत खंदारे