रानसई धरणाच्या पाणी पातळीत घट

उरण : उरण तालुका, नगरपालिका आणि परिसरातील प्रकल्पांना पाणी पुरवठा करणारे उरण तालुक्यातील ‘एमआयडीसी'चे रानसई धरण आटले असून, १५ मे २०२४ पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक या धरणामध्ये आहे. या अगोदरच पाणी कपात २ दिवस केली असतानाही पावसाळ्यापर्यंत उरणकरांना पाणी कसे पुरवता येईल? या विवांचनेत ‘एमआयडीसी'चे अधिकारी पडले आहेत.

दरम्यान, उरणकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन ‘एमआयडीसी'चे अधिकारी विठ्ठल पाचपुंड यांनी केले आहे.
रानसई धरणातून उरण तालुक्यातील २१ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद आणि ओएनजीसी, बीपीसीएल, एनएडी सारख्या इतर मोठ्या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. उरण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून, मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झाल्याने येथे येणाऱ्या प्रकल्पांना रानसई धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणातून दररोज सुमारे ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
‘सिडको'च्या हेटवणे पाणी पुरवठा विभागाकडून रोज ४ एमएलडी पाणी ‘एमआयडीसी'ने उरणकरांसाठी घेणे सुरु केले आहे.  उरण तालुक्याला रोज १० एमलडी पाण्याची गरज लागते. त्यापैकी ६ एमएलडी पाणी रानसई धरणातून घेतले जाते, तर रोज ४ एमएलडी पाणी ‘एमआयडीसी'कडून विकत घेऊन उरणकरांची तहान भागवली जाते.
उरण तालुक्याला आणि येथे असलेल्या प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी १९७० च्या दशकात रानसई धरण बांधण्यात आले होते. ‘रानसई'च्या निसर्गरम्य अशा डोंगर कपारीत सदर धरण बांधण्यात आले आहे. सुमारे ६.८ चौरस किलोमीटर क्षेत्रात धरण आहे. या धरणाची १० मिलियन क्युबिक मीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. मात्र, गेल्या वर्षी पाऊस लवकर गेल्याने धरणाच्या पाणीसाठा कमी झाला.
सध्या रानसई धरणात ९७.११ फुटापर्यंत पाण्याची पातळी आहे. रानसई धरणात २.०१८ एमसीएम पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक पाणीसाठा १५ मे पर्यत पुरेल एवढाच आहे. मात्र, ३० जून पर्यंत उरणकरांना पाणी पुरविण्यासाठी ‘एमआयडीसी'ला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

‘उरण'चे औद्योगीकरण आणि नागरीकरण  वाढले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. ३० जून पर्यंत पाणी पुरवण्यासाठी चिंता वाढली आहे. २ दिवस पाणी कपातही केलेली आहे. आता ३ दिवस पाणी कपात करावी लागणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.
-विठ्ठल पाचपुंड, उपअभियंता-एमआयडीसी, उरण. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी सार्वजनिक रुग्णालयाची नवनियुवत आयुवतांकडून प्रत्यक्ष पाहणी