एपीएमसी बाजारातील फळ आवक मध्ये वाढ

वाशी ः वाशी मधील मुंबई  कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात मागील काही दिवसांपासून फळांची आवक वाढत चालली आहे. फळांची आवक वाढल्याने एपीएमसी फळ बाजार बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, एपीएमसी फळ बाजार परिसरात दररोज दुपार पर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसते.
सध्या उन्हाचा पारा चढत असल्याने आणि रमजान महिना सुरु असल्याने रसदार फळांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात कलिंगड, टरबूज, पपई या फळांची आवक वाढली आहे. सोबतच एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याच्या हंगामाने जोर पकडला असल्याने होळी नंतर बाजारात हापूस आंब्याची आवक देखील वाढली असून, रोज ५० हजार पेक्षा जास्त हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी फळ बाजारात दाखल होत आहेत.

एपीएमसी फळ बाजारात सर्वच फळांना मागणी वाढल्याने रोज ५०० पेक्षा अधिक फळांच्या गाड्या एपीएमसी फळ बाजारात दाखल होत आहेत. २ एप्रिल रोजी एपीएमसी फळ बाजारात एकूण ५३४  गाड्या फळे आवक झाली. एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात फळांची आवक वाढल्याने फळांच्या गाड्या खाली करण्यास विलंब लागतो. परिणामी एपीएमसी फळ बाजार आवारात जागा कमी पडत असल्याने बाजार बाहेर फळांच्या गाड्यांची लांबच लांब रांग लागत  आहे. त्यामुळे तुर्भे-वाशी लिंक रोडवर तुर्भे कडे जाणाऱ्या रस्त्यावर  मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आयुक्तांकडून ‘ठाणे'तील प्रकल्पांची पाहणी