मालमत्ता करांचा सर्वोच्च उच्चांक एका दिवसात 12 कोटीचा भरणा

पनवेल : पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर भरण्याचे शेवटचा एक दिवस शिल्लक राहीला असून, मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीनूसार मा. उच्च न्यायालयाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही.त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता करांमध्ये भरघोस वाढ होताना दिसत आहे. मालमत्ता कर भरण्याची 31मार्च शेवटची तारीख असल्याने सुट्टीच्या दिवशी रविवारीही महापालिकेचे कार्यालय सुरू राहणार आहे.

 आजवरच्या मालमत्ता करांच्या दररोजच्या संकलनामधील उच्चांकांमध्ये आज भरघोस वाढ दिसून आली. एका दिवसात १२ कोटीचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत आज झाला आहे. दिनांक 1 मार्च ते ३० मार्च  दरम्यान सुमारे ५२ कोटीची वसुली मालमत्ता कर विभागाने आतापर्यंत केली आहे. एकुणच महापालिकेच्या चारही प्रभागातून मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद आज दिसून येत आहे.

 नुकत्याच झालेल्या सुनावणीनूसार मा. उच्च न्यायालयाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे सध्या 17 वसुली पथकांच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रात वसुली मोहिम सुरू आहे.आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना सवलती देऊन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतू आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या होत्या यांना आता वॉरंट नोटीसा देण्याचे काम पालिकेने युध्दपातळीवर सुरू केले आहे.  तसेच अटकावणीच्या मोहिमेलाही सुरूवात करण्यात आली आहे. याचा थकबाकीदार यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या होत्या, अशा थकबाकीदारांकडून  मालमत्ता कर वसुलीसाठी सहाय्यक आयुक्त  स्वरूप खारगे ,करअधिक्षक महेश गायकवाड तसेच कर अधिक्षक सुनील भोईर  यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाच्या माध्यमातून आज चारही प्रभागातून  उच्चांकी वसुली झाली आहे.

 नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन सातत्याने रिक्षामधून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून चारही प्रभागांमध्ये केले जात आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून दररोज  दीड  कोटीहून अधिक भरणा  होताना दिसत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 3लाख 50 हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदी नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे विविध झोन तयार केले आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत ३५२ कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने  'सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड ' तयार केले आहे.

महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास  1800-5320-340   या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रासायनिक सांडपाण्यावर पिकवलेली पालेभाजी ग्राहकांच्या माथी?