रासायनिक सांडपाण्यावर पिकवलेली पालेभाजी ग्राहकांच्या माथी?

नवी मुंबई शहरात रेल्वेच्या अनेक मोकळ्या जागा आहेत. या जागेत अतिक्रमण होऊ नये, या उद्देशाने रेल्वे रुळांलगतच्या मोकळ्या जागेत भाजीपाला पिकवण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, रेल्वे रुळांलगतच्या मोकळ्या जागेत पालेभाजी पिकवताना पाण्याचा दर्जा राखला जात नाही. रेल्वे रुळांलगतच्या मोकळ्या जागेत पालेभाजी पिकविणारे शेतकरी थेट रासायनिक नाल्यातील सांडपाणी पंपाच्या सहाय्याने पालेभाजी शेतीला देतात. त्यामुळे प्रदूषित पाण्यापासून पिकवली जाणारी पालेभाजी नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांद्वारे वर्तविली जात आहे.
नवी मुंबई शहरातील हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गाशेजारी गटारातील पाण्यावर पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्या किरकोळ बाजारात विकल्या जात आहेत  गावठी भाज्यांच्या नावाखाली त्यांची विक्री सुरु आहे. जुईनगर, तुर्भे ते एरोली तसेच इतर ठिकाणी रेल्वे रुळालगत नाल्यातील सांडपाण्यावर पिकविली जाणारी पालेभाजी गवताच्या काड्यांनी बांधलेली असते. त्यामुळे ग्राहकांची पालेभाजी खरेदी करताना फसगत होते. नवी मुंबई मध्ये पनवेल आणि उरण येथून विक्रीसाठी येणाऱ्या गावठी पालेभाज्या या गवताच्या काड्यांनीच बांधलेल्या असतात. या पालेभाज्या गावागावातील भाजी विक्रेते विशेष करुन परप्रांतीय भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या पालेभाज्यांच्या तुलनेत गटारातील पाणी, रासायनिक सांडपाण्यावर पिकविण्यात येणाऱ्या पालेभाज्या अधिक ताज्या वाटतात. मात्र, गटारातील पाणी, रासायनिक सांडपाण्यावर पिकविलेल्या पालेभाज्या सेवन केल्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. या विरोधात एका सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यालयायात धाव घेतली असता, ‘रेल्वे रुळांलगत गटारातील पाणी, रासायनिक सांडपाण्यावर पालेभाजी  पिकवण्यास मनाई करा', असे  सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला २०१९ मध्ये दिले आहेत.मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना हारताळ फासून नवी मुंबई मध्ये आजही रेल्वे रुळांलगत गटारातील पाणी, रासायनिक सांडपाण्यावर भाजी पिकवली जात आहे.
---------------------------------------
सध्या नवी मुंबई मधील रेल्वे रुळालगत गटारातील पाणी, रासायनिक सांडपाण्यावर पालेभाज्यांची  लागवड केली जाते. विशेष म्हणजे या पालेभाज्या ग्रामीण भागातून येणाऱ्या पालेभाज्यांपेक्षा ताज्या आणि टवटवीत दिसतात. मात्र, या पालेभाज्यांसाठी नाल्यातील पाणी वापरले जाते. त्यामुळे रेल्वे रुळालगतच्या पालेभाजी शेतीसाठी टँकर किंवा विहिरी मधील पाणी वापरण्याची गरज आहे. - महेश जाधव, नागरिक - नवी मुंबई.
-----------------------------------
रेल्वे रुळांलगत पिकविण्यात येणाऱ्या पालेभाजी शेतीचा विषय केंद्र शासनाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे रेल्वे रुळांलगत पिकविण्यात येणाऱ्या पालेभाजीचे नमुने किंवा इतर कार्यवाही केंद्र शासन मार्फतच केली जाते. - जी. व्ही. जगताप, सहाय्यक आयुक्त - फूड सेपटी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया, वाशी विभाग. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महानगरपालिकेचा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम