महापालिका मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक

पनवेल : नागरिकांनी पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मालमत्ताधारकांनी त्यांचा मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिका द्वारे करण्यात आले आहे.

दरम्यान, २७ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात खारघर कॉलनी फोरम तर्फे पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात दाखल जनहित याचिकावर सुनावणी घेण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्यापुढे झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस महापालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीमध्ये पनवेल महापालिका तर्फे जेष्ठ विधीज्ञ ॲड. आशुतोष कुंभकोणी यांच्यासमवेत ॲड. केदार दिघे यांनी विधीज्ञ म्हणून काम पाहिले. मालमत्ता कर भरण्यासाठी ३१ मार्च २०२४ शेवटची तारीख असून, ज्या मालमत्ताधारकांनी आपले मोबाईल नंबर आपल्या खात्याशी कनेक्ट केले नाहीत, त्यांनी आपले मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावे जेणे करून मालमत्ता कराचे बिल प्रत्यक्ष त्याच मालमत्ताधारकाच्या मोबाईलवरती जाईल. तसेच मालमत्ता बिलात किरकोळ दुरूस्त्या असतील तर त्या तातडीने करून घ्याव्यात, असे आवाहन महापालिका मालमत्ता कर विभाग द्वारे करण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिल्याने आज ३० मार्च (शनिवार) आणि उद्या ३१ मार्च (रविवार) रोजी महापालिका कार्यालये नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस महापालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याने तसेच पुढील वर्षाची दोन टक्के शास्ती वाचविण्यासाठी मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२४ पूर्वी मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई प्रवेशद्वाराच्या फ्लायओव्हर खालील जागा बकाल