नवी मुंबई प्रवेशद्वाराच्या फ्लायओव्हर खालील जागा बकाल

 नवी मुंबई : नवी मुंबईत भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी हायवे येथील फ्लायओव्हर खाली शेकडो निराश्रीतांचा तांडा वास्तव्यास करत आहे. त्यांच्याकडून सदर ठिकाण बकाल करण्यात येत असून प्रत्येक वर्षी स्वच्छता अभियानात अग्रेसर असणारी नवी मुंबई हीच आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. येथे आसरा घेणारे निराश्रित दिवसभर शहरातील प्रत्येक सिग्नलवर भिक मागण्याचा व्यवसाय करतात,एखाद्या वाहनचालकाने भिक स्वरुपात पैसे न दिल्यास त्यांच्या वाहनांवर स्क्रॅच/ओरखडा  मारण्याचे प्रकार हे भिकारी करत आहेत आणि याबाबत नवी मुंबईकर नाराजी व्यक्त करत असून संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत वाशी ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन नाईक यांनी व्यक्त केली आहे. 

नवी मुंबई हे एकविसाव्या शतकातील आधुनिक आणि सुनियोजित शहर म्हणून संबोधले जाते.प्रत्येक वर्षी देश तसेच राज्य पातळीवरील स्वच्छता अभियानांत तसेच विविध उपक्रमांत नवी मुंबई शहराचा क्रमांक पहिल्या तीन मध्ये असतोच.आणि त्यामुळे नवी मुंबई शहराचा पाहणी दौरा करण्यासाठी इतर महानगरपालिका क्षेत्रातील समित्या येत असतात.आणि या समित्यांनी सध्या नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी येथील फ्लायओव्हर खालील जागा पाहिल्यास हेच का ते स्वच्छता आणि इतर उपक्रमांत अव्वल असणारे नवी शहर आहे का असा प्रश्न त्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.या फ्लायओव्हर ब्रिजखाली खाली शेकडो निराश्रित कुटुंबांनी मागील अनेक दिवसांपासून वास्तव्य केलेले आहे. हे कोण आहेत,कुठून आले आहेत याचा काहीही थांगपत्ता प्रशासनाला आहे किंवा नाही याची माहिती कुणालाही नाही. तिथेच खाणे ,पिणे आणि झोपणे असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. पोटासाठी दिवसभर हे निराश्रित भिक मागण्याचा व्यवसाय शहरातील सिग्नलवर आणि चौकात करत असतात. एखाद्या वाहन चालकाने भिक न दिल्यास त्यांच्या वाहनांना ओरखडे मारण्याचा प्रताप यांच्याकडून केला जातो.त्यामुळे वाहनचालकांना वेगळा भुर्दंड सोसावा लागतो. अशी खंत वाशी ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन नाईक यांनी व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे सायन ते माटुंगा आणि पुढे दादर दरम्यान च्या मुख्य रस्त्यावरील फ्लायओव्हर खाली नागरिकांना चालण्यासाठी वाकिंग ट्रक,उद्यान बसण्यासाठी बाकडे,लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी इत्यादी सुविधा व व्यवस्था पुरवून संपूर्ण भाग लोखंडी जाळीने बंद केलेला आहे.तसेच झोपडपट्टी बहुल भाग असणाऱ्या मानखुर्द ते गोवंडी दरम्यानच्या फ्लायओव्हर खाली देखील अश्याच प्रकारे सुशोभिकरण करून तो भाग बंदिस्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना देखील सुखद वाटते. त्याप्रमाणेच वाशी फ्लायओव्हर खालील  भीड आणि बकालपणा घालविण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर फ्लायओव्हर खालील जागांचा विकास करण्यात यावा अशी भूमिका सचिन नाईक यांनी मांडली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी आवारात लाकडी पेट्या बनवणाऱ्यांवर महापालिका तर्फे कारवाई