‘जलजीवन मिशन'ची रखडली ६ ठिकाणची कामे

नवीन पनवेल : जलजीवन मिशन योजना अंतर्गत पनवेल तालुक्यातील १३१ ठिकाणच्या कामांना मंजुरी मिळाली. मात्र, यातील ६ कामे वन विभागाच्या जागेमुळे रखडली असल्याचे पनवेल पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. वन विभागाच्या परवानगी नंतरच रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत.

जलजीवन मिशन योजना अंतर्गत पनवेल तालुक्यातील ११ ठिकाणची कामे पूर्ण झालेली आहेत. तर अपूर्ण कामांची संख्या आणि प्रगतीपथावर असलेली १२२ कामे आहेत. ९८ ठेकेदारांना नोटीसा दिलेले आहेत. यापैकी १५ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले, त्यांनी री टेंडर केले आहेत. ५२ ठिकाणच्या मुदत संपलेल्या योजनांचे प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात आले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली. सांगटोली, दापोली, नानोशी, शिरवली, चिंचवली तर्फे वाजे, शिरढोण या ठिकाणची कामे वन विभागामुळे रखडली आहेत.

पनवेल पंचायत समिती येथील पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार सांगटोली येथील पाण्याच्या टाकीची जागा वन विभागाची आहे. या ठिकाणी विहिरीचे काम सुरु असून २५ % काम पूर्ण झाले आहे. दापोली येथील टाकी आणि पाईपलाईन वन विभागाच्या जागेत आहेत. येथील ४० % काम पूर्ण आहे. नानोशी येथील टाकी वन विभागाच्या जागेत आहे. काही ठिकाणची पाईपलाईन टाकण्यात आली असून ४० टक्के काम पूर्ण असल्याचे सांगण्यात आले. तर शिरवली येथील टाकी वन विभागाच्या जागेत असून येथील ६० टक्के काम पूर्ण आहे. चिंचवली तर्फे वाजे येथील पंपघर वन विभागाच्या जागेत आहे. तेथील ९० % काम पूर्ण आहे. तर शिरढोण येथील काम वाईल्ड लाईफमुळे रखडले असून येथील ७० टक्के काम पूर्ण असल्याचे सांगण्यात आले.

पूर्ण झालेली कामे...
आंबे तर्फे तळोजे, आंबिवली, दापिवली, दिघाटी, कोपर, मोहोदर, मोहपे, नितळस, सांगडे, शिवकर, वांगणी तर्फे वाजे.

पाणी टंचाईने नागरिक हैराण...
उन्हाळा सुरु झाला असून काही ठिकाणी पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. यावर्षी तरी जलजीवन मिशन योजनाचे पाणी चाखायला मिळेल, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, बहुतांशी ठिकाणी कामे पूर्ण झालेली नाहीत. ठेकेदारांकडून वेळकाढूपणा काढला जात असल्याने त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. शासकीय अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित पाहणी केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

यापूर्वीची तेरा कामे मंजूर केलेली आहेत. काहींचे प्रस्ताव आता दिलेले आहेत. -ज्ञानेश्वर सोनवणे, वन परिक्षेत्र अधिकारी-पनवेल. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘मध्य रेल्वे'ची वाहतूक विस्कळीत