‘सायकल राईड'द्वारे मतदान अन्‌ पर्यार्वरणस्नेही होळीचा संदेश

ठाणे : ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होळी सणाचे औचित्य साधून पर्यावरणस्नेही होळी साजरी व्हावी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन आपला हक्क बजावावा, असा संदेश देण्यासाठी ‘सायकल राईड'चे आयोजन करण्यात आले होते. या ‘राईड'मध्ये १६० सायकलप्रेमींनी सहभाग घेतला.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका तर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरु आहे. या अभियान अंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान याच्याबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे. याच ‘अभियान'चा एक भाग म्हणून २४ मार्च रोजी दोन टप्प्यात सायकल राईड संपन्न झाली. नितीन जंक्शन ते निर्बंध रोड आणि ठाणे पूर्व पवई ते मीठबंदर रोड असे या ‘राईड'चे मार्ग होते.

‘एकेका मताने बनते पडते सरकार' म्हणून तुमचे मत करु नका बेकार', संपूर्ण जगात आहे भारतीय लोकशाहीचे नाव, मतदान करुन जागृतपणे दाखवा त्याची शान', ‘मतदान का हक हे हर नागरिक का हक, जो इसे बजायेगा सच्चा नागरिक कहलायेगा', ‘मतदान करा, परिवर्तन घडवा', ‘युवर व्होट इज युअर व्हॉइस' अशा संदेशासह या वेळेला सायकल प्रेमींनी ‘राईड'मध्ये सहभाग घेतला.

कोपरी येथील मीठबंदर रोड ॲम्पिथिएटर येथे या ‘सायकल राईड'ची सांगता झाली. विश्वविक्रमी सायकलपटू सतीश जाधव यांनी मतदानाची माहिती देऊन पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी मतदान का करावे याची माहिती देत खरे नैसर्गिक रंग आणि बाजारात नैसर्गिक रंगाच्या नावाखाली विकले जाणारे रासायनिक रंग यांच्यातील फरक समजावून सांगितला.

‘लोकल राईड'चे नेतृत्व संकेत सोमणे, चंद्रशेखर जगताप, अजय भोसले, गुरुप्रसाद देसाई, विनोद फर्डे, पंकज कुंभार यांनी तर ‘लाँग राईड'चे नेतृत्व पंकज रिजवानी, अमोल कुलकर्णी, योगेश नाखवा, महेश राऊत, महेश सोमवंशी आणि आदेश जाधव यांनी केले. ‘राईड'नंतर सर्वांनी एकमेकांना पर्यावरणपूरक रंग लावत जिलेबी, फापडा आणि पुरणपोळी यांचा आस्वाद घेतला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

होळीच्या पोळ्या गरजूंना केल्या दान