ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट लवकरच स्टॉल मुक्त

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकांतील फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी फलाटांवरील स्टॉल हटविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवरील स्टॉल हटविण्यास मध्य रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. रेल्वे स्थानकातील फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांतील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील प्रमुख उपनगरी रेल्वे स्थानकातील गर्दी गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी ‘मध्य रेल्वे'च्या मुंबई विभाग अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक स्थानकांमध्ये पाहणी केली. या पाहणीत रेल्वे फलाटांवरील खाद्यपदार्थ स्टॉल जागा व्यापण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होतात. त्यामुळे गर्दीच्या रेल्वे स्थानकांतील फलाटांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी मध्य रेल्वेकडून खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कुर्ला, कल्याण, डोंबिवली आणि वडाळा रोड रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच दादर, ठाणे आणि घाटकोपर स्थानकांतील फलाटांवरील स्टॉल हटवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. स्टॉलधारकांना स्थानकाच्या प्रवेशद्वारालगत रेल्वे हद्दीत पर्यायी जागा देण्यात येणार असून, रेल्वे स्थानकातील स्टॉलधारकांच्या पसंतीनुसार स्थानक परिसरातील ‘रेल्वे'च्या जागेतील अन्य ठिकाणी त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मागाठाणे ते ठाणे स्टेशन बेस्ट बसच्या टायरला आग; जीवितहानी नाही