पनवेल, बेलापूर मधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
खारघर : सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने २२ मार्च रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून पनवेल मधील धाकटा खांदा आणि बेलापूर मधील ‘सिडको'च्या भूखंडावर केलेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.
पनवेल नोड मधील धाकटा खांदा शेजारील सेक्टर-१६ मधील भूखंड क्रमांक-१५०, १५३ वर विनापरवानगी १८ खोल्यांचे बांधकाम करण्यात आले होते. सदर १८ खोल्यांचे बांधकाम सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने २२ मार्च रोजी जमीनदोस्त करण्याची काराई केली. तर बेलापूर मधील ‘सिडको'च्या भूखंडावर अतिक्रमण करुन उभारण्यात आलेली इमारत सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून निष्कासित करण्यात आली.
दरम्यान, सिडकोकडून गेल्या ८ दिवसात खारघर, तळोजा, पनवेल, बेलापूर मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून, यापुढील काही दिवसात ‘सिडको'च्या हद्दीत विनापरवानगी आणि अनधिकृतपणे करण्यात आलेली बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत, असे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले.