खांदा कॉलनी, कळंबोली मध्ये पाणी बाणी

नवीन पनवेल : खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहती मध्ये गेल्या तीन दिवसापासून पाणी गायब झाल्याने उन्हाळ्याच्या झळांसोबत पाण्याची झळ देखील सोसावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना खांदा कॉलनी आणि कळंबोला या वसाहतीमध्ये घडत असून, नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे .मात्र, याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी)  सिडको आणि पनवेल महापालिका प्रशासन काहीही उत्तर देत नसल्याने नागरिकांचे हाल होत असून, एकप्रकारे पाणी बाणी झाल्याचे चित्र खांदा कॉलनी, कळंबोली वसाहतीमध्ये दिसत आहे.

कळंबोली वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या भोकरपाडा येथील जलवाहिनीच्या कामासाठी एक दिवस पाणी नसल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी एमजेपी किंवा सिडको द्वारे जाहीर केलेल्या वेळेत किंवा त्यापेक्षा तीन-चार तास जास्त झाले नाही असे कधीही होत नाही. त्यामुळे या पदावर बसलेले अधिकारी नक्की त्या पदाची पदवी घ्ोवून आले आहेत का?, याबाबत संशय बळावत आहे. प्रत्यक्षात खांदा कॉलनी, कळंबोली वसाहतीमध्ये १८ मार्च पासूनच पाणी गायब झाल्याने येथील हाउसिंग सोसायटी मधील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा अन्य कोणताही स्त्रोत खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहतीमध्ये नसल्याने पाणी कुठून उपलब्ध करावे?, असा यक्ष प्रश्न या वसाहतींमधील रहिवाशांसमोर उभा ठाकला आहे.  पाणी पुरवठा खंडीत होणार असल्याबाबत कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नसल्याने रहिवाशांनी पाण्याची सोयच केली नाही. त्यामुळे या खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहतीमध्ये पाणीही विकत मिळत नाही.

सिडको किंवा पनवेल महापालिकेकडून अन्य कोणतीही पाणी पुरवठ्याची उपाययोजना नसल्याने खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहत मधील नागरिकांचे पाण्याअभावी पुरते बेहाल होत आहेत. अजूनही उन्हाळा हंगाम पूर्ण बाकी असताना आत्ताच पाण्याच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. पाणी पुरवठा खंडित होण्याच्या घटना खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहत मध्ये वारंवार घडत असून, यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे. पाण्याचे बिल भरपूर भरायचे पण पाणीपुरवठा मात्र त्या प्रमाणात होत नसल्याची ओरड  सोसायटी मधील रहिवासी करीत आहेत. या गोष्टीकडे सिडको आणि पनवेल  पनवेल महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक त्रस्त अन्‌ प्रशासन सुस्त असल्याचे चित्र खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहती मध्ये दिसत आहे. खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहतीमध्ये पाण्याची गळती होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी अद्यापही सुरु असून, याकडेही लक्ष देऊन कायमस्वरुपी पाण्याची गळती आणि चोरी थांबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पाण्याचा दाबही अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे रहिवाशांनी हाऊसिंग सोसायटीमध्ये विद्युत मोटर पंप लावल्याशिवाय पाणी ओढले जात नाही. त्याचा अधिक खर्च रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सिडको आणि पनवेल महापालिका प्रशासनाने सुरळीत आणि मोठ्या दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी आता खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहत मधील नागरिकांकडून केली जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्लास्टिक पिशव्या विक्री रोखण्यात महापालिका प्रशासनाला अपयश