प्लास्टिक पिशव्या विक्री रोखण्यात महापालिका प्रशासनाला अपयश

वाशी : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करण्यास मनाई असून देखील नवी मुंबई शहरात होळी सणाच्या मुहूर्तावर आज जागो-जागी प्लास्टिक पिशवीत पाणी भरुन मारण्याचे प्रकार सुरु आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील प्लास्टिक विक्री नवी मुंबई महापालिकेला अद्याप थोपवता आली नसल्याचे चित्र दिसत आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासनाने २०१८ मध्ये थर्माकोल आणि एकल प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. या विरोधात कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर दिली आहे. नवी मुंबई शहरात थर्माकोल आणि एकल प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर महापालिका तर्फे कारवाई करण्यात येते. दरवर्षी स्वच्छ भारत अभियान सुरु होताच महापालिका तर्फे प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती करत प्लास्टिक विक्री विरोधी कारवाईला वेग येतो. मात्र, महापालिका प्रशासनाची पाठ फिरताच पुन्हा प्लास्टिक पिशवी विक्री जोमात सुरु होत असते.

सध्या होळी सणाच्या मुहूर्तावर तर प्लास्टिक पिशवी विक्रीचे प्रमाण अधिक वाढले आहे. होळी सण आणि पाण्याने भरलेले फुगे मारणे, असे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासुन सुरु आहे. आता  प्लास्टिक पिशवी स्वस्त झाल्याने या फुग्यांची जागा प्लास्टिक पिशव्यांनी घेतलेली आहे. अल्पवयीन मुले नवी मुंबई शहरात सर्रासपणे प्लास्टिक पिशवीत पाणी भरुन त्याचा फुग्यासारखा वापर करीत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीसाठी केलेली जनजागृती फवत कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्त नवी मुंबई शहर करण्याच्या हेतूने नवी मुंबई महापालिका प्लास्टिक विरोधी कारवाया करुन प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती करीत आलेली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाची कारवाई लहान व्यवसायिकांवरच होत असते. त्यामुळे महापालिकेने जर ‘प्लास्टिक'च्या मुळ उत्पादकांचा शोध घेऊन त्यांच्यावरच कारवाई केली तर प्लास्टिक उत्पादनात घट होऊन प्लास्टिक बंदीचा हेतू साध्य होणार आहे. - बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष - पर्यावरण सेवा भावी संस्था, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एमआयडीसी वसाहतीत पाणी टंचाई