‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग'च्या पुलावर अनधिकृत भित्तीपत्रके, संदेशवहन तारा

नवी मुंबई : सिडको मेट्रो मार्ग-१, बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग' पुलावर आणि स्थानकांवर खासगी व्यक्ती आणि संस्थांकडून मेट्रो रेल्वे प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत भित्तीपत्रके (पोस्टर) लावण्यात आल्याचे तसेच संदेशवहन तारा (कम्युनिकेशन वायर) टाकण्यात आल्याचे सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून संबंधित व्यक्ती/संस्था यांनी अनिधकृत भित्तीपत्रके आणि संदेशवहन तारा काढून न टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सिडको प्रशासनाने दिला आहे.

‘सिडको'च्या मेट्रो मार्ग क्रमांक-१ वर १७ नोव्हेंबर २०२३ पासून प्रवासी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. काही खासगी संस्थांकडून या मेट्रो मार्गावरील पुलावर आणि स्थानकांवर अनधिकृतरीत्या भित्तीपत्रके लावण्यात आली असून, संदेशवहनच्या ताराही टाकण्यात आल्या आहेत. यामुळे मेट्रो गाड्यांच्या परिचालनास आणि मेट्रो रेल्वेच्या बांधकामांस धोका निर्माण झाला आहे. सिडको किंवा मेट्रो प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता करण्यात आलेल्या या कृतींना मेट्रो रेल्वे तर्फे मनाई करण्यात आली आहे.

संबंधित व्यक्ती/संस्था यांनी सदर वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत स्वतःहून ‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग'वरील अनधिकृत भित्तीपत्रके आणि संदेशवहन तारा काढून टाकाव्यात. अन्यथा, मेट्रो रेल्वे प्राधिकरणाकडून सदर भित्तीपत्रके आणि संदेशवहन तारा काढण्यात येतील. तसेच भविष्यात मेट्रोशी संबंधित बांधकामांवर अनधिकृत भित्तीपत्रके किंवा तारा आढळून आल्यास मेट्रो प्राधिकरणाकडून भित्तीपत्रके आणि तारा काढून मेट्रो रेल्वे प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करून दंड आकारण्यात येईल, असा इशारा सिडको प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खांदा कॉलनी, कळंबोली मध्ये पाणी बाणी