मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढला

पनवेल : पनवेल महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्यावतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्ती पूर्व नोटीसांबरोबर वॉरंट नोटीसा दिल्यानंतर आता मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे चारही प्रभागामध्ये नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढू लागला आहे. दरम्यान आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे जप्तीपुर्व नोटीसानंतर सात दिवस दिवसांचा कालावधी पुर्ण होऊनही मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा यासाठी गृहभेटी व स्थळभेटी देण्यावरती वसुली पथकांनी भर दिला आहे. परिणामी नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास  प्रतिसाद वाढू लागला आहे. यासाठी वसुली पथकांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

सध्या 17 वसुली पथकांच्या माध्यमातून  महापालिका कार्यक्षेत्रात वसुली मोहिम सुरू आहे.  पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये सुमारे  435हून अधिक जप्तीपूर्वीच्या नोटीसा तसेच 14 वॉरंट नोटीसांचे वाटप थकबाकीदार मालमत्ता धारकांना दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनूसार जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे. परिणामी आज खारघर प्रभागातून सुमारे 25 लाखाहून अधिक भरणा करण्यात आला आहे. तसेच कामोठ्यामधील जवाहर औद्योगिक वसाहत व निवासी थकीत मालमत्ताधारकांकडून सुमारे 11 लाखाची वसुली करण्यात आली आहे. याप्रमाणेच कळंबोलीमधून देखील 13 लाखाहून अधिक वसुली करण्यात आली आहे.याबरोबरच ऑनलाईन पध्दतीने असा आज एकुण 1 कोटी 50 हजाराचा भरणा पालिकेच्या तिजोरीत झाला आहे.

 आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना सवलती देऊन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतू आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या होत्या यांना आता वॉरंट नोटीसा देण्याचे काम पालिकेने युध्दपातळीवर सुरू केले आहे.  तसेच अटकावणीच्या मोहिमेलाही सुरूवात करण्यात आली आहे. याचा थकबाकीदार यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

 दरम्यान मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने तसेच  नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन सातत्याने रिक्षामधून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून चारही प्रभागांमध्ये केले जात आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये रोज 1 कोटीहून अधिकभरणा  होताना दिसत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात 3लाख 50 हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदी नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे विविध झोन तयार केले आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 287 कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने  'सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड ' तयार केले आहे.

महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास  1800-5320-340   या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कर वसूलीचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी नियोजनबध्द पावले