मालमत्ता कर वसूलीचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी नियोजनबध्द पावले

नवी मुंबई : मालमत्ता करामधून जमा होणाऱ्या निधीतून नवी मुंबई महापालिका मार्फत विविध नागरी सुविधा कामे करण्यात येत असून, त्यादृष्टीने मालमत्ताकर वसूलीचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

दरम्यान, मालमत्ता कर अभय योजनेचा लाभ घेऊन नवी मुंबई शहर विकासाला हातभार लावावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई शहरातील नागरिकांना केले आहे.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शानुसार मालमत्ता कर थकबाकीधारकांना दिलासा देणारी ‘मालमत्ताकर अभय योजना' १ मार्च पासून राबविण्यात येत असून, या योजनेची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपणार आहे.

मालमत्ताकर अभय योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त थकीत मालमत्ताकर धारकांनी घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या आर्थिक वर्षात ५५० कोटी मालमत्ताकर वसूलीचा टप्पा पार करण्यात आला असून, त्यामध्ये अधिक वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजनांची अमंलबजावणी करण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

महापालिका मालमत्ताकर विभाग प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले या मालमत्ताकर विभाग अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेत असून, वसूलीचा आढावा घेऊन अधिक गतीमान कार्यवाहीसाठी नियोजन केले जात आहे. यासाठी थकबाकीधारकांची उतरत्या क्रमाने यादी तयार करुन क्षेत्रीय मालमत्ताकर अधिकारी, कर्मचारीवृंदांना करवसूलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले आहे. याशिवाय मालमत्ताकर थकबाकीदारांची नावे प्रसिध्द करुन कायदेशीर अटकावणीची कार्यवाही देखील करण्यात येत आहे.  
मालमत्ताकर अभय योजना अंतर्गत २० मार्च पर्यंत मालमत्ता कराची थकीत रक्कम भरल्यास शास्तीमधील ७५ % रक्कम माफ करण्यात येणार असून, सदर कालावधी संपण्यास केवळ आजचाच दिवस उरला आहे.

दरम्यान, २१ मार्च नंतर ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत मालमत्ताकर भरल्यास थकीत मालमत्ता करासह शास्तीची रक्कम केवळ ५० % रक्कम भरणा करावी लागणार आहे. त्यामुळे मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी थकीत मालमत्ताकरावरील शास्तीच्या रक्कमेत भरीव सूट प्राप्त करुन घ्यावी तसेच मालमत्ताकर वेळच्या वेळी भरुन शहर विकासास हातभार लावावा, असे आवाहन करतानाच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आवाहनास प्रतिसाद न देणाऱ्या थकीत मालमत्ताकर धारकांविरोधातील कारवाई तीव्रपणे राबविण्याचे निर्देशित केले आहे.

मालमत्ताकर थकबाकीधारकांमध्येही अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. याश्विाय मागील ४ वर्षात करनिर्धारणा पूर्ण झालेली असूनही, मालमत्ताकर भरणा बाकी असलेल्या मालमत्ता थकबाकीदारांच्या करवसूलीकडेही महापालिका द्वारे विशेष लक्ष दिले जात आहे.- राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 निवडणुकीचे बिगुल वाजताच नवी मुंबई शहर ‘बॅनर'मुक्त?